परवानगी मिळताच वणीतील ‘दारू’पेठ फुलली…

बार व वाईनशॉपवर तळीरामांची एकच गर्दी

0

जितेंद्र कोठारी, वणी: घरपोच दारूविक्री जिल्हाधिकारी यांनी परवानगी देताच आज सकाळपासून शहरातील बार आणि वाईनशॉपवर लोकांनी एकच गर्दी केली, मिनी लॉकडाऊन लागल्यापासून दारूचे दुकाने बंद असल्यानंतर आज तब्बल दोन आठवड्यानंतर घरपोच दारूविक्रीसाठी शासनातर्फे परवानगी देण्यात आली. याला वणीतील सॅनिटायझर प्यायल्याने गेलेल्या बळीचा देखील संदर्भ होता. अखेर दारूचे दुकाने सुरू होताच घरपोच दारूचा फज्जा उडाला. दारू घरपोच मिळण्याऐवजी शौकिनच दुकानाजवळ गेले. अखेर पोलिसांनी जाऊन शॉप व बार बंद केले. मात्र पोलीस जाताच पुन्हा दुकाने सुरू झाली.

संध्याकाळीच दारूविक्री सुरू होणार म्हणून शौकिनांनी जिल्हाधिकारी यांच्या ऑर्डरची कॉपी व्हॉट्सऍपवरून फॉरवर्ड करण्यास सुरूवात केली होती. अनेकांनी पैशाच्या जुगाडाची व किती स्टॉक आणायची ऐपत आहे याची चाचपणी सुरू केली होती. आणखी लॉकडाऊन लागून दुकाने बंद झाली तर पंचायत यायला नको म्हणून लोकांनी दुकाने सुरू व्हायच्या आधीपासूनच बार व शॉपवर गर्दी केली. दरम्यान दारुच्या दुकानांवर मोठी रांगच दिसून आली.

पोलिसांचे आगमन आणि तळीराम सैरावैरा
घरपोच दारूविक्री ऐवजी बार आणि शॉपमधूनच विक्री होताना दिसून आल्याने पोलिसांनी जाऊन दारू विक्री होत असलेले दुकाने बंद केले. मात्र पोलीस जाताच सैरावैरा झालेले ग्राहक पुन्हा परत आले व दारूविक्री देखील पुन्हा सुरु झाली. मिनी लॉकडाऊनपासून दारू विक्री बंद असल्याने तळीराम अधिक दराने ब्लॅकमध्ये दारुची खरेदी करीत होते. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनच्या भीतीने तळीरामांनी रात्रीच पैशाचे जुगाड करून स्टॉक करण्यावर भर दिला.

लायसन्स धारकानाच मिळणार घरपोच दारु
जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी 26 एप्रिल रोजी निर्गमित सुधारित आदेशानुसार एफएल- 2 (विदेशी मद्याची किरकोळ विक्री) व एफएल- 3 (भारतीय बनावटीचे विदेशी मद्य व इतर विदेशी मद्य विक्री) अनुज्ञप्ती धारकांना ग्राहकाची मागणीनुसार घरपोच (Home Delivery) मद्य विक्री करता येईल. तर एफएल-3 (देशी दारुची किरकोळ विक्री) अनुज्ञप्ती धारक दुकानातून फक्त सीलबंद बाटलीतून घरपोच विक्री करता येईल. परंतु एफएल- 4 ( नोंदणीकृत क्लब व विशेष कार्यक्रम करीता विदेशी तसेच भारतीय बनावटीची विदेशी दारु विक्री) व एफएल/बीआर-2 (सीलबंद बॉटलीमधून बियरची किरकोळ विक्री) या अनुज्ञप्ती धारकांना कुठल्याही प्रकारे मद्य विक्री करता येणार नाही.

लॉकडाउन नियमावली प्रमाणे दारुची घरपोच सेवा सकाळी 7.00 ते 11.00 वाजे पर्यंतच देता येणार आहे. परवानाधारक दारु दुकानदारांना कोणत्याही परिस्थितीत दुकाने उघडून किंवा पार्सल पद्दतीने मद्य विक्री करता येणार नाही. तसेच घरपोच सेवा देताना छापील किरकोळ मूल्य (MRP) वर मद्य विक्री करणे बंधनकारक आहे. घरपोच दारु पुरविणाऱ्या डिलिव्हरी बॉयची वैद्यकीय चाचणी करून मास्क व सॅनिटायझर वापरणे अनिवार्य आहे.

लॉकडाऊनच्या काळात सरकारने आता घरपोच दारू विक्राली परवानगी दिली आहे पण महाराष्ट्रात दारू पिण्यासाठी तुमच्याकडे लायसन्स आहे का? महाराष्ट्रात मद्यसेवनसाठी बॉम्बे प्रोहिबिशन अॅक्ट अनव्ये लायसन्स घेण्याची गरज असते. यासाठीची वयोमर्यादा ही 21 वर्षे आहेत. (म्हणजे वीस वर्षापर्यंतचे तरुण कायद्याने मद्यपान करू शकत नाहीत.) हा परवाना 1 दिवस, 1 वर्ष किंवा आजीवन मिळू शकतो. लायसन्स नसलेल्यांना दारु विक्री करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे मद्य विक्रेत्यांनी यासंदर्भात योग्य ती खबरदारी घ्यावी लागेल.

हे देखील वाचा:

धक्कादायक… सॅनिटायझर प्यायल्याने संध्याकाळी आणखी एकाचा मृत्यू

आशादायी: आज कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

Leave A Reply

Your email address will not be published.