जितेंद्र कोठारी, वणी: पत्नी व मुलांना चिमूर जाण्याकरिता सोडण्यासाठी बस स्थानकावर आलेले बँक मॅनेजर वणी बस स्थानक येथुन बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अविनाश गंगाधर जांभुळे असे बेपत्ता झालेल्या बँक मॅनेजरचे नाव असून ते एसबीआयच्या नांदेपेरा शाखेत शाखा प्रबंधक म्हणून कर्तव्यावर आहे.
वणी येथील मंगलम पार्कमध्ये अविनाथ गंगाधर जांभुळे हे भाड्याने राहतात. शुक्रवार 27 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता अविनाश यांनी पत्नी, मुलगा आणि मुलगी हिला चिमूर जाण्यासाठी वणी बसस्थानक येथून बसमध्ये बसविले होते. बँकेचे ऑडिट सुरु असूनही अविनाश जांभुले बँकेत पोहचले नसल्यामुळे बँकेतील शिपायाने त्यांच्या मोबाईलवर कॉल केला. मात्र अविनाशचा मोबाईल स्विच ऑफ येत होता.
अनेकदा प्रयत्न करूनही साहेबांशी संपर्क झाले नसल्याने अखेर बँक कर्मचाऱ्यांनी अविनाशची पत्नी सविता हिला फोन करून साहेब आज बँकेत का नाही आले? अशी विचारणा केली. तेव्हा सविता यांनीही अविनाश सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र अविनाशचा मोबाईल सतत बंद दाखवीत होता. अखेर सविता हिने भद्रावती येथील अविनाशचा भाऊ राहुल याला कॉल करून अविनाश भद्रावतीला आले का अशी विचारणा केली. परंतु राहुल यांनी नकार दिल्याने सविता चिमूर येथून परत वणीला आली.
वणी येथे व नातेवाईकांकडे शोध घेऊनही अविनाशचा काही पत्ता लागला नाही. तर अविनाशची मोटरसायकल वणी बस स्थानकावर बेवारस आढळून आली. दिवसभर शोध घेऊन अखेर शुक्रवार रात्री 9 वाजता दरम्यान अविनाशची पत्नी सविता जांभुळे यांनी वणी पोलीस ठाण्यात तिचे पती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली.
वणी पोलिसांनी बस स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली आहे. मात्र बातमी लिहेपर्यंत काही सुगावा लागला नसल्याची माहिती आहे. बँक मॅनेजर सारख्या महत्वाच्या पदावर काम करणारा अविनाश हा पत्नी व घरच्या लोकांना काही न सांगता अखेर कुठे गेला असेल, याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे. दरम्यान कुटुंबीयांना बस स्टँडवर गाडीत बसवून ते घरी परत आले. त्यांनी कपडे बदलले आणि बॅग घेऊन परत बस स्टँडवर गेले होते. अशीही माहिती मिळत आहे.
15 दिवसांआधीही एक तरुण बेपत्ता झाला होता
पंधरा दिवसापूर्वी रविनगर येथील एक तरुणसुद्धा वणी बस स्थानकावर आपली दुचाकी ठेऊन बेपत्ता झाला होता. त्यावेळी पोलिसांनी वेगाने तपासचक्र फिरवून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने सदर युवका शोधले होते. सदर युवक चंद्रपूर रेल्वे स्थानक येथे आढळून आला होता. त्यानंतर 15 दिवसातच ही दुसरी घटना घडली आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.