ज्योतिबा पोटे, मारेगाव: स्थानिक एंजल्स पॅराडाईज इंग्लीश मीडियम स्कूलच्या बसला हिवरी वळणावर अपघात झाला. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. स्कूल बसमध्ये तांत्रिक बिघाड होऊन चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
मारेगाव शहरातील एंजल्स पॅराडाईज स्कूलची बस विद्यार्थ्यांना सगनापुरला सोडुन हिवरीला गेली. हिवरीवरुन मारेगावला येत असताना हिवरी वळणावर स्कूल बस क्र.एम एच ३२ क्यु ५९१२ या वाहनाच्या क्लचमध्ये अचानक तांत्रिक बिघाड आला. त्यामुळे वाहन चालकाचे नियंत्रण सुटले व स्कूल बस रस्त्याच्या कडेला पलटली. सुदैवाने या स्कूल बसमध्ये एकही विद्यार्थी नसल्यामुळे संभाव्य धोका टळला. वाहन चालक चंदु चौधरी (२६) याला सुध्दा सुदैवाने कुठलीही ईजा झाली नाही.
सध्या मारेगाव शहरात इंग्लिश मीडियम स्कूलचे फॅड आले असून आपला पाल्य इंग्रजी शाळेत शिकावं अशी पालकाची मनोमन इच्छा असते, पण तिथली व्यवस्था हि त्या त्या शाळेतिल व्यवस्थापनेवर अवलंबुन असते. सुदैवाने कोणताही विद्यार्थी जखमी झाला नसला, तरी विद्यार्थ्यांना पोहचवुन परत येताना असे अपघात यापूर्वी दोन,तीन वेळा झाले आहे. याचं कारण भरधाव वेग असल्याच सांगण्यात येत असलं तरी शाळा व्यवस्थापनेनी तशा प्रकारच्या सूचना स्कूल बस चालवनार्या ड्रायव्हरला दिल्या का? हासुद्धा प्रश्न पालक उपस्थित करीत आहे.