भंगार चोरट्यांची सुरक्षा रक्षकांशी झटापट, चोरट्यांचा जवानावर लोखंडी रॉडने हल्ला

एक MSF रक्षक व चोरटाही जखमी, पिंपळगाव खाणीतील घटना, 60 हजारांचे भंगार जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: भंगार चोरताना अचानक सुरक्षा रक्षक आल्याने भंगार चोरट्यांशी सुरक्षा रक्षकांशी झटापट झाली. यात एका भंगार चोरट्याने सुरक्षा रक्षकाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. वेकोलिच्या पिंपळगाव खाणीत बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या झटापटीत एक चोरटाही जखमी झाला असून त्याला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. संजय वाईकर नामक असे आरोपीचे नाव असून या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की मनोज संजय चव्हाण (28) हे भालर टाऊनशिप येथे राहत असून ते महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) येथे नोकरीला आहे. सध्या ते भालर येथील वेकोलिच्या खाणीत रुजू असून त्यांच्याकडे भालर वेकोलि अंतर्गत येणा-या खाणीच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत त्यांची शिफ्ट असते. मंगळवारी दिनांक 3 जानेवारी रोजी रात्री ते नेहमीप्रमाणे त्यांचे सहकारी विशाल खंडारे, सुरेंद्र मुडगुलवार, गजानन चव्हाण व वेकोलिचे सुरक्षा रक्षक रितेश लाडे यांच्यासह पेट्रोलिंग करीत होते. स. 6 वाजताच्या सुमारास ते सर्व ब्राह्मणी रोड मार्गे जुनाड खाणीकडे जात असताना पिंपळगाव या बंद असलेल्या खाणीसमोर काही इसम एका पिकअप वाहनामध्ये (MH34 BG3018) भंगार (बंद पडलेल्या व्होलपडच्या लोखंडी वस्तू) भरताना आढळले.

सुरक्षा रक्षकांना भंगाराची चोरी होताना दिसताच त्यांनी चोरट्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान एका चोरट्याने सुरक्षा रक्षक विशाल खंडारे (26) यांच्यावर लोखंडी सळाखीने हल्ला केला व ते सर्व पळू लागले. सर्व रक्षकांनी चोरट्यांचा पाठलाग केला असता त्यांनी तिथून पळ काढला. मात्र त्यातील एक चोरटा हा पळताना खाली पडला व जखमी झाला. त्याला सुरक्षा रक्षकांनी नाव विचारले असता त्याने संजय वाईकर (19) रा. गोळुळ नगर वणी असे सांगितले. त्याला इतर साथीदारांची नावे विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

पिकअप वाहनामध्ये 60 हजारांचे भंगार आढळून आले. भंगार चोरी व हल्ला केल्या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींवर भादंविच्या कलम 332, 353, 394 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत असून प्रकरणाचा तपास वणी पोह प्रभाकर कांबळे हे करीत आहे.

हे देखील वाचा: 

नागपुरातील मिहान व समृद्धी हायवे लगत NMRDA मंजूर प्लॉट 9.99 लाखात

न्यू रसोई (प्युर वेज) रेस्टॉरन्ट ग्राहकांच्या सेवेत

Comments are closed.