शासकीय मैदानावर मूर्तीकारांची जोरदार घोषणाबाजी

पोओपी मूर्तीविरोधात मूर्तीकार संघटना आक्रमक, घेतली एसडीओंची भेट, पथकाला कारवाईचा अधिकारच दिला नसल्याची माहिती

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्त्यांची विक्री होऊ देऊ नये अशी मागणी वणीतील मूर्तीकार संघटनेतर्फे करण्यात आली होती. त्यांच्या मागणीवर कार्यवाही करत नगरपालिकेने कारवाई पथकाची स्थापना केली. मात्र शहरात पीओपीच्या मूर्त्यांची सर्रास विक्री होत असल्याने मूर्तीकार संघटनेचे सदस्य आज संतप्त झाले. त्यांनी पाण्याच्या टाकीजवळ पालिकेच्या पथकासमोर जोरदार घोषणाबाजी करत याचा निषेध केला. दरम्यान पथकाने आम्हाला केवळ पाहणी करण्याचा अधिकार आहे कारवाईचा नाही अशी धक्कादायक माहिती पथकाने दिल्याने केवळ फार्स म्हणून तर हे पथक सुरू केले नाही असा आरोप मूर्तीकार संघटनांनी केला आहे.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वणीतील पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदान येथे मूर्तीकारांना विक्रीसाठी जागा दिली जाते. आजपासून वणीत या ठिकाणी मूर्तीविक्रीला सुरूवात झाली. सुमारे 50 दुकाने या ठिकाणी लागलेले आहे. दरम्यान संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास या ठिकाणी पालिकेच्या पथकाने भेट दिली. तेव्हा काही ठिकाणी पीओपीच्या मूर्तीची विक्री होत असल्याची माहिती मूर्तीकार संघटनेच्या लोकांनी पथकाला दिली. मात्र पथकाने कारवाईचा अधिकार नसल्याचे सांगितल्याने मूर्तीकार संघटनेचे सदस्य संतप्त झाले. त्यांनी याविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत थेट तहसील कार्यालय गाठले व उपविभागीय अधिकारी यांची याबाबत भेट घेतली आहे. वृत्त लिहेपर्यंत त्यांची एसडीओ यांच्यासोबत बैठक सूरू होती.

कारवाई पथक बनले शोभेची बाहुली
शहरात पीओपीच्या मूर्ती विक्रीसाठी आल्याची बाब लक्षात येताच शहरातील मूर्तीकारांनी नगरपालिकेला दोनदा निवेदन दिले. अखेर नगर पालिकेने कारवाई पथकाची स्थापना केली. या पथकात 5 ते 6 लोक आहेत. सध्या हे पथक गस्तीवर आहे. संघटनेच्या सदस्यांनी पीओपी मूर्तींची विक्री करणा-यांबाबत माहिती दिली. मात्र पथकाने आम्हाला केवळ पाहणी करण्याचा व लोकांना पीओपीची मूर्ती विकत घेऊ नका हे सांगण्याचाच अधिकार असल्याचे सांगितले. त्यामुळे पालिकेचा कारवाई पथकाचा केवळ फार्स होता का? असा संतप्त सवाल मूर्तीकार संघटनेतर्फे विचारला जात आहे.

पोओपीच्या मूर्त्यांपासून पर्यावरणाला धोका आहेत. शिवाय यामुळे नदीचे देखील मोठे नुकसान होते. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त वणी शहरातील सर्व व्यावसायिक मूर्तीकारांनी पर्यावरण पुरक मातीच्या मूर्त्या बनविण्याचा व केवळ त्याच मूर्त्यांची विक्री करण्याचा एकमताने निर्णय घेतला होता. यातील अनेक मूर्तीकार हे कलाकार आहेत. तसेच त्यांचा परंपरागत हा व्यवसाय आहे. पीओपीच्या मूर्ती विक्रीला शासनाची परवानगी नाही त्यामुळे त्यांनी केवळ मातीच्या मूर्तीची परवानगी द्यावी अशी मागणी मूर्तीकार संघटनेद्वारा करण्यात आली होती.

हे देखील वाचा:

गणेशोत्सव ऑफर: सोलर झटका मशिनवर तुर कटर, डॉग हॉर्न, टॉर्च मोफत

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीला शिक्षा

लग्न होत नसल्यामुळे चिडवल्याने दोन मित्रांमध्ये वाद

Comments are closed.