तहसील कार्यालयाजवळ एका दुचाकीस्वारावर कोसळला वृक्ष

रस्त्यावर वृक्ष कोसळल्याने एका दिशेची वाहतूक विस्कळीत

विवेक तोटेवार, वणी: तहसील कार्यालयाच्या जवळ आज संध्याकाळच्या सुमारास एक झाड अचानक कोसळले. हे झाड थेट एका दुचाकीस्वाराच्या अंगावर पडले. मात्र सुदैवाने दुचाकीस्वाराला मोठी इजा झाली नाही. संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी तिथे एकच गर्दी केली होती. दरम्यान झाड रस्त्याच्या मध्ये पडल्याने एका दिशेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

सविस्तर वृत्त असे की टिळक चौक ते बसस्टॉप या मुख्य मार्गावर तहसील कार्यालयाजवळ एक वृक्ष आहे. झाडाजवळच बेल्ट आणि गॉगलची विक्री होते तसेच एक दोन फ्रुटचे दुकान ही आहे. आज गुरुवारी दिनांक 9 सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास हलका वारा आणि पाऊस सुरू होता. दरम्यान 7.30 वाजताच्या सुमारास ते वृक्ष अचानक मुळापासून रस्त्यावर कोसळले.

दरम्यान या वेळी ऍक्टिव्हा वाहनावरून एक 45 ते 50 वर्षांची व्यक्ती बस स्टॉपच्या दिशेने जात होती. त्याच वेळी हे वृक्ष त्याच्या गाडीवर पडले. मात्र सुदैवाने त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही व केवळ त्याला थोडे खरचटे. झाड पडातच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली व दुचाकीस्वाराला व गाडीला बाहेर काढले.

वृक्ष कोसळल्याने एका बाजूची वाहतूक खोळंबली होती. जवळच असलेल्या पोलीस स्टेशनला ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. वृत्त लिहेपर्यंत अद्याप वृक्ष बाजूला काढण्यासाठी प्रशासनातर्फे कुणीही आले नव्हते. त्यामुळे एका दिशेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

हे देखील वाचा:

शासकीय मैदानावर मूर्तीकारांची जोरदार घोषणाबाजी

गणेशोत्सव ऑफर: सोलर झटका मशिनवर तुर कटर, डॉग हॉर्न, टॉर्च मोफत

Comments are closed.