नवजात बाळाची विक्री करण्याचा डाव उधळला

3.5 लाखांमध्ये सौदा, सापळा रचून प्रकरणाचा पर्दाफाश, 'बेटी फाउंडेशन'ची संचालिकाच निघाली 'बेटी' विक्रीची मध्यस्थी

जितेंद्र कोठारी, वणी: एका 15 दिवसांच्या नवजात बाळाची विक्री करण्याचा घाट उधळून लावण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणी वणीतील एका सामाजिक संस्थेची संचालिकाच बाळाचा सौदा करण्यात मधस्थी करीत असल्याचे समोर आले आहे. दत्तक देण्याच्या नावाखाली बाळाच्या विक्रीचा प्रयत्न सुरू होता. पथकाने सापळा रचून ‘बेटी फाउंडेशन’ची प्रीती माडेकर दरेकर हिच्या रंगनाथ नगर येथील घरी संध्याकाळी छापा मारला. या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे.

Podar School 2025

सविस्तर वृत्त असे की, चार दिवसांआधी अकोला येथील एक बाल कल्याण समिती या संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांच्या व्हॉट्सऍपवर 15 दिवसांचे बाळ दत्तक देणे असल्याचा मॅसेज पोहोचला. बाळ दत्तक देण्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यासाठी बराच वेटिंग पिरियडही असतो. हा प्रकार बेकायदेशीरित्या असल्याने पल्लवी कुलकर्णी यांनी मॅसेजची खात्री करण्याचे ठरवले. मॅसेजच्या खाली प्रीती माडेकर दरेकर, संचालक बेटी फाउंडेशन असे नाव व संपर्क क्रमांक होता. पल्लवी कुळकर्णी यांनी या मॅसेजची खात्री करण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर कॉल केला. त्यांनी भावाला अपत्य नसल्याने त्यांना बाळ पाहिजे असल्याची बतावणी केली. आरोपी प्रीती माडेकरने 15 दिवसांचे बाळ उपलब्ध असल्याचे सांगितले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सदर प्रकरण हे बाळ विक्रीचे असल्याचे आढळून आले. त्यामुळे पल्लवी कुलकर्णी यांनी तातडीने याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यवतमाळचे पोलीस निरीक्षक बबन कराळे यांना दिली. त्यांनी सापळा रचला व डमी टिम तयार करण्यात आली. पल्लवी कुलकर्णी सह राजू लाडूलकर, देवेंद्र राजूरकर हे त्यांचे भाऊ बनले. तर वनिता शिरफुले ही भावजयी बनली. भावाचा मित्र पोलीस निरीक्षक बबन कराळे झाले. गुरुवारी दिनांक 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता ते वणीतील रंगनाथ स्वामी मंदीराच्या मागे असलेल्या प्रीती माडेकर दरेकरच्या घरी गेले. घरा बाहेर पोलिसांनी सापळा रचला व इशारा करताच छापा मारण्याचा प्लान आखला गेला.

माडेकरच्या घरी गेल्यावर पल्लवी कुलकर्णी यांनी डमी भावजयी वनिता शिरफुले यांना अपत्य नाही असे सांगितले. तिथे त्यांची बाळासाठी चर्चा झाली. बाळाचा 3.5 लाखांमध्ये सौदा झाला. डमी टिमने बाळ दाखवण्याची विनंती केली असता प्रीती दरेकरने घराच्या आतील खोलीतून 15 दिवसांचे एक बाळ (मुलगी) आणून दाखवली. बाळाची विक्री होत असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांनी बाहेर असलेल्या टीमला इशारा केला. इशारा करताच पोलिसांनी दरेकरच्या घरी छापा मारला.

पोलिसांनी घरून आरोपी प्रीती कवडू दरेकर (28) रा. रंगनाथ नगर वणी अध्यक्ष बेटी फाउंडेशन, कवडू गजानन दरेकर (35), गौरी गजानन बोरकुटे (35), मंगला किशोर राऊत (44) यांना ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात आणले. बाळाच्या आईवडिलांनाही खरबडा परिसरातून ठाण्यात बोलावून घेतले. बाळाच्या पालकांची चौकशी केली असता त्यांनी प्रीती माडेकर ही सौद्यातील 1 लाख 20 हजार रुपये आम्हाला देणार होती. तर उर्वरित रक्कम वरील 4 जण वाटून घेणार असल्याचे सांगितले.

बाळ विक्रीचा पर्दाफाश झाल्याने फिर्यादी पल्लवी संजय कुलकर्णी अध्यक्ष बाल कल्याण संघटना अकोला यांच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात आरोपी प्रीती कवडू दरेकर (28), कवडू गजानन दरेकर (35), गौरी गजानन बोरकुटे (35), मंगला किशोर राऊत (44) व यांच्यासह बाळाचे आई वडिल यांच्यावर भादंविच्या 370, सहकलम मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 च्या कलम 81, 87 नुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

सदर कारवाई पल्लवी कुलकर्णी, पोनि. बबन कराळे, तपोनि शुभांगे आगाशे, पोलीस हवालदार अरविंद बोबडे, अशोक आंबिलकर, अरुण दोडके, महिला पोलीस कर्मचारी अर्चना मेश्राम, प्रमिला डेरे, एलसीबीचे एपिआय विवेक देशमुख, उल्लाह कुरकुटे, किशोर झेंडे, सलमान शेख, देवेंद्र गोडे यांच्या सह वणीचे ठाणेदार शाम सोनटक्के, डीबी पथक प्रमुख एपीआय आनंद पिंगळे, माया चाटसे व वणी पोलीस स्टेशन यांनी केली.

परिसरात बेटी फाउंडेशन ‘अवॉर्ड वाटप’साठी प्रसिद्ध
परिसरात अलिकडेच बेटी फाउंडेशन ही आपल्या ‘अवॉर्ड वाटप’ उपक्रमाने प्रसिद्ध झाली होती. वणीसह परिसर, राज्य, परराज्यातील हौशी लोकांना या संस्थेद्वारा ‘ठोक’मध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिला जायचा. या संस्थेव्दारे रविवारीच वणीतील एका लॉनमध्ये अवॉर्ड वाटप कार्यक्रम पार पडला होता. विशेष म्हणजे दोन वर्षांआधी चंद्रपूर जिल्यातील एका बड्या नेत्याच्या होस्टेलमध्ये एका आदिवासी मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघड झाल्याने राज्यभर खळबळ उडाली होती. मात्र घटनेच्या काही दिवसांनीच या संस्था चालकाच्या नातेवाईकाला या संस्थेने आपला आंतरराष्ट्रीय अवॉर्ड जाहीर करण्याचा प्रताप केला होता. तेव्हा वणीतील आदिवासी संघटनांनी याला विरोध दर्शवत अवॉर्ड फंक्शन उधळून लावण्याचा इशारा दिला होता. अशा अवॉर्डमुळे ही संस्था आधीच वादात आली होती.

हे देखील वाचा:

Comments are closed.