लखन व जलवा या जोडीचा शंकरपटात जलवा

शंभराहून अधिक बैलजोड्यांचं दमदार प्रदर्शन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नावात काय आहे असं शेक्सपिअरनं म्हटलं. मात्र आपलं नाव लखन आणि जलवा या बैलजोडीनं सिद्ध करून दाखवलं. शहरातील यात्रा मैदानावर जवळपास 25 वर्षांनंतर शंकरपटाचा थरार रंगला. यात लखन आणि जलवा ही जोडी अव्वल ठरली. नावाप्रमाणेच जलवानं आपला जलवा अखेरपर्यंत कायम राखला. एकाहून एक सरस जोड्यांनी विदर्भ केसरी शंकरपटात चाहत्यांची मनं जिंकलीत. गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारीला सायंकाळी याची सांगता झाली. यशस्वी जोड्यांना बक्षिसं देण्यात आली. आमदार प्रतिभाताई धानोरकर, मुख्य आयोजक संजय खाडे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. पटाच्या तिस-या दिवशी 100 जोड्या धावल्यात.

या शंकरपटातील अ गटात करोडी येथील मनोहर पाटील चव्हाण यांची लखन व जलवा ही जोडी पहिली ठरली. या जोडीनं 6.54 सेकंदांत अंतर कापत 1 लाख रुपयांचं रोख पारितोषिक पटकावलं. तर क गटात दहिवड येथील कु. भव्या अमोल पवार यांची जलवा व सैराट ही जोडी विजेती ठरली. या जोडीन 6.79 सेकंदांत अंतर कापत 41 हजारांचं रोख पारितोषिक पटकावलं. अखेरच्या दिवशी 40 हजारांपेक्षा अधिक लोकांनी या शर्यतींचा थरार अनुभवला.

अ गटात दुसरं बक्षिस हिवरा येथील साहेबराव पाटील यांच्या लक्ष्या व राणा या जोडीनं, तिसरं बक्षिस धारफळ येथील अशोकराव पाटील यांच्या बजरंग व वंशी या जोडीनं पटकावलं. क गटात दुसरं बक्षिस वडगाव येथील नवनाथ महाराज प्रसन्न यांच्या हिरा व शिवा जोडीनं तर घोंगशी कांडा येथील राम चव्हाण यांच्या बलमा व नंद्या या जोडीनं तिसरं बक्षिस पटकावलं. या दोन्ही गटांत पहिल्या येणाऱ्या 13 शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसं देण्यात आलीत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

बक्षिस वितरण समारंभात बोलताना आ. प्रतिभा धानोरकर यांनी शंकरपट हा शेतक-यांना आनंद देणारा खेळ असल्याचं म्हटलं. वणीत अनेक वर्षांनंतर हा खेळ सुरु झाल्यानं बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत असल्याचं मनोगत व्यक्त केलं. तर आयोजक संजय खाडे यांनी हजारोंच्या संख्येने लोकांनी उपस्थिती दर्शवल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानलेत. यापुढेही कायम अशा स्पर्धा, खेळ घेण्यात येतील, अशी ग्वाही दिली.

परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार
या शंकरपटा दरम्यान वणी विधानसभा क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, खेळ, कला, पत्रकारिता, उद्योजक्ता, महिला सक्षमीकरण इत्यादी क्षेत्रांत आपल्या कार्यांतून समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे सदस्य व संजय खाडे मित्र परिवारातील शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Comments are closed.