जितेंद्र कोठारी, वणी: ट्रान्सपोर्टरकडून होणारी वसुली, चारगाव व कायर येथे राजरोसपणे चालणारी मटकापट्टी, तर कायर येथील मटकापट्टीचा तर व्हिडीओच व्हायरल झाल्याने शिरपूर पोलीस स्टेशनच्या अब्रुचे चांगलेच धिंडवडे निघाले असतानाच, आता परिसरात आणखी एका चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. शिरपूर पो.स्टे. अंतर्गत येणा-या सुंदरनगर येथे चालणा-या प्रसिद्ध कोंबडबाजारासाठी आतापासूनच ऍडव्हांस बुकिंग झाल्याची खुमासदार चर्चा सध्या रंगत आहे. या सुंदर’कांडात’ जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या आदेशाला खुदा ‘हाफिज’ करून ऍडव्हांस घेतल्याचे बोलले जात आहे.
पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बडग्याच्या (कर) दिवशी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोंबड बाजार भरविला जातो. सुंदरनगर येथील कोंबड बाजाराची परिसरात सर्वात नावाजलेला (कुप्रसिद्ध) म्हणून ओळख आहे. या बाजारात वणी तालुक्यातीलच नव्हे तर पांढरकवडा, करंजी तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना, गडचांदूर, भद्रावती, वरोरा येथील शौकीन दाखल होतात. कोंबड्याच्या झुंजीवर शर्ती, अवैध दारु, पत्ती जुगार, झंडीमुंडी खेळातून कोट्यवधींची उलाढाल या एका दिवसाच्या बाजारात होत असते.
सध्या जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या धडाकेबाज कामांमुळे अवैध व्यावसायिकांची चांगलीच गोची झाली असली तरी दुस-या बाजुने ‘सेटिंग’ करण्यासाठी अवैध व्यावसायिकांनी चांगलीच कंबर कसली आहे. सुंदरनगर येथील कोंबड बाजारासाठी एका मटका व्यावसायिकाने पोलिसांची झंझट नको म्हणून चक्क ऍडव्हान्स बुकिंग केल्याची खुमासदार चर्चा परिसरात सुरू आहे. विशेष म्हणजे या दिवशीच्या बाजारासाठी ठरलेल्या रकमेतील 30 हजार रुपये टोकण मनी देखील दिल्याचेही बोलले जात आहे.
बडग्याची (कर) वाट पाहतात जुगार शौकिन
पोळ्याच्या दुस-या दिवशी परिसरात मोठ्या प्रमाणात जुगार चालतो. काही ठिकाणी तो लपून छपुन असतो तर काही ठिकाणी सेटिंग करून चालवला जातो. मात्र बडग्याला खरी रंगत असते ती कोंबड बाजाराची! या दिवसाची अनेक शौकिन वाट बघत असतात. शौकिनांचीही या दिवसासाठी आधीपासूनच पैशाची जुळवाजुळव सुरू होते. शिवाय त्या दिवशी कोणती रिस्क नको म्हणून कोंबड बाजार भरवणारेही आधीपासूनच ‘अर्थ’पूर्ण सेटिंग करून ठेवतात. या एका दिवशी एका कोबंडबाजारात झुंज, शर्ती, अवैध दारु, पत्ती जुगार, झंडीमुंडी इत्यादींवर कोट्यवधींची उलाढाल होत असल्याची माहिती शौकिन देतात. त्यावरून याच्या ‘सेटिंग’ साठी किती खिसा मोकळा करावा लागतो याची कल्पना येऊ शकते.
शेतकऱ्यांच्या शेतातून पीक घरी येण्याच्या नोव्हेंबर महिन्यात अनेक ठिकाणी कोंबड बाजार भरण्यास सुरवात होते. त्यानंतर हा कोंबड बाजार शेतीचे कामे सुरु होत पर्यंत सुरू राहतो. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत मोहदा, पिंपरी, शिंदोला, मेंढोली, शिरपूर, आबई फाटा, वरझडी गाव शिवारात कोंबड बाजार भरविण्यात येतो. मात्र सध्या सर्व कोंबड बाजार बंद आहेत. परंतु बडग्याच्या ‘वन डे मॅच’साठी व दिवाळीनंतरच्या कोंबडबाजारासाठी कोंबड बाजारची परवानगी मिळावी यासाठी इच्छूक अवैध व्यावसायिकांनी आतापासूनच सेटिंग लावणे सुरु केले आहे.
अवैध धंद्याने पोलीस ठाण्याच्या अब्रुची लक्तरे वेशीवर !
ट्रान्सपोर्टरकडून घेण्यात येणा-या अवैध वसुलीमुळे आधीच शिरपूर पोलीस ठाण्याच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगले गेले होते. त्यातच चारगाव व कायर येथील राजरोजपणे सुरू असलेल्या मटका उघडकीस आला. कायर येथे राजरोसपणे सुरू असलेल्या मटक्याचा तर व्हिडीओही व्हायरल झाला आहे. त्यातच कोंबडबाजाराच्या बुकिंगची सध्या चर्चा सुरू असल्याने पोलिसांची प्रतिमा मलिन होत आहे. याकडे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त करीत आहे.
हे देखील वाचा: