भास्कर राऊत, मारेगाव: सध्या उन्ह आणि पावसाचा खेळ दिसून येत आहे. दिवसा कडक उन्ह तर सायंकाळच्या वेळेस पावसाच्या सरी असा काहीसा अनुभव तालुक्यातील नागरिक अनुभवत आहे. असे विचित्र वातावरणाचा आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो असे डॉक्टर सांगत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पण पावसाळ्याच्या मानाने पाहिजे तसा पाऊस अजूनही तालुक्यात झालेला नाही. पिकांची पेरणी झाल्यानंतर सुरुवातीला दमदार पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाने काही काळ दडी मारलेली होती. परंतु दडलेल्या पावसाने आपला रुसवा सोडत बरसायला सुरुवात केली खरी.
आता तर कधी पाऊस कधी उन्ह असे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या उन्ह एवढे तापत आहे की अनेकांनी बंद केलेले कुलर पुन्हा सुरू केले आहे. रात्री तरी या उकाड्यापासून आराम मिळेल असे वाटत असतानाच रात्रीसुद्धा कूलर सुरूच ठेवावे लागत आहे. आता जुलै महिना अर्धा जास्त उलटून गेला तरी उष्णता कमी न झाल्याने नागरिकांची चांगलीच दमछाक होत आहे.
सकाळी 8 वाजताच अंगातून उष्णतेमुळे चांगलाच घाम निघत आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसांमध्ये होत असलेल्या या गर्मीमुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. उन्हाळ्यामध्ये उष्णतेची जेवढी दाहकता जाणवत नव्हती तेवढी दाहकता आता जाणवत असल्याने या उष्णतेमुळे सर्वच स्तरातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच मध्येच पुन्हा पावसाच्या सरी सुरू होतात.
अशा विचित्र वातावरणामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज निर्माण झाल्याचे डॉक्टर सांगत आहे. पावसाळ्याच्या मध्यात आलो तरी अजूनही उष्णता कमी होत नसल्याने पिकांवर सुद्धा या गोष्टीचा परिणाम होणार असल्याने शेतकरी वर्ग सुद्धा चिंतेत दिसून येत आहेत.
हे देखील वाचा:
राजूर (कॉ) मध्ये मध्यरात्री पुन्हा घरफोडी, शेजारी ओरडल्यानंतर चोर फरार