नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील, मारेगाव, मार्डी केंद्रावर शासकीय कापूस खरेदी तात्काळ चालु करावी या मागणीचे निवेदन तालुका कॉंग्रेस कमेटी मारेगावच्या वतीने तहसिलदार यांना देण्यात आले.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नवीन हंगामातील कापुस वेचणीला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांकडे कापुस जमा झाला असला तरी अजुनपर्यंत शासकीय कापुस खरेदीस सुरुवात झाली नाही. प्रत्येक शेतकऱ्यांकडे किमान वीस ते पंचवीस क्विंटल कापूस घरी साठवला आहे. कर्ज किंवा खर्च करायचा झाल्यास कवडीमोल दरात कापुस व्यापाऱ्याला विकावा लागेल. त्यामुळे शेतकरी बांधव अडचणीत आला आहे.
अगोदरच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होवू नये यासाठी शासनाने मारेगाव तालुक्यात तात्काळ शासकीय खरेदी सुरु करावी अशा आशयाचे निवेदन मारेगाव तालुका कॉंग्रेस कमेटीच्या वतीने तहसिलदार यांना देण्यात आले.
यावेळी जि. प. सदस्या अरुणा खंडाळकर, पंचायत समिती सभापती शीतल पोटे, तालुका अध्यक्ष मारोती गौरकर, यादवराव पांडे, पांडुरंग नन्नावरे, आदी कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)