पत्रकाराच्या अटकेविरोधात उपविभागीय पोलीस अधिका-यांना निवेदन

प्रभाकर भोयर मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची शहरातील पत्रकारांची मागणी

0

जितेंद्र कोठारी, वणी: प्रभाकर भोयर मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याबाबत शहरातील पत्रकारांतर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. प्रभाकर भोयर मृत्यू प्रकरणी वणी शहरातील पत्रकार विवेक तोटेवार यांना दिनांक 10 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. त्यांनी कव्हर केलेल्या एका बातमीच्या आधारे ही अटक झाली आहे. एखाद्या बातमीच्या आधारे जर पत्रकारांना अटक होत राहिली तर पत्रकारांना पत्रकारिता करणे कठिण होईल. संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य व मीडियाला मिळालेल्या स्वातंत्र्यावर हा घाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शहरातील पत्रकारांनी निवेदनातून केली. यावेळी मोठ्या संख्येने शहरातील पत्रकार उपस्थित होते.

आज सोमवारी दिनांक 14 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता वणी शहरातील विविध पत्रकार संघटना व शहरातील पत्रकार यांनी एकत्र येत उपविभागीय पोलीस अधिकारी यांची भेट घेतली. दरम्यान उपविभागीय अधिकारी यांनी पत्रकारांची बाजू ऐकून त्यांच्याशी चर्चा केली. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले. चर्चेनंतर पत्रकारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की शेतमालक मृतक प्रभाकर भोयर यांच्या शेतात त्यांच्या सालगड्याचा विजेचा करंट लागून मृत्यू झाला होता. शेतमालकाने याबाबत कोणतेही नुकसान भरपाई (कम्पेन्सेशन) देण्यास असमर्थता दर्शवली. मृतक सालगड्याच्या मुलांनी प्रत्रकारितेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचे आर्जव करीत विवेक तोटेवार यांची भेट घेतली होती. विवेक यांनी बातमीच्या स्वरुपात त्यांची बाजू मांडली. सोबतच मृतक प्रभाकर भोयर यांचे स्टेटमेंट घेऊन त्यांची देखील बाजू बातमीत मांडली होती.

बातमी आल्याच्या काही दिवसांनी शेतमालक प्रभाकर भोयर यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. सुमारे 15 दिवसांनी त्यांचा नागपूर येथे मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. त्यामुळे त्यांचे शवविच्छेदन झाले नाही, शिवाय त्यांचे मृत्यूपूर्व कोणतेही बयान झाले नाही. या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र प्रभाकर भोयर यांच्याशी कधी भेट ही झाली नसताना किंवा त्यांच्याशी कोणता संपर्क नसतानाही पत्रकार विवेक तोटेवार यांना अटक करण्यात आली. असा असे निवेदन म्हटले आहे.  

सर्वसामान्यांची, अन्यायग्रस्तांची बाजू मांडणे हा पत्रकारांचा धर्म आहे. पत्रकारितेचा धर्म पाळून त्यांनी बातमी केली. मात्र त्यात त्यांनाच आरोपी करण्यात आले व केवळ त्यांना एकट्यांनाच सराईत गुन्हेगार व सूत्रधार असल्यासारखे अटक करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या पत्रकारांनी अन्यायग्रस्तांची बाजू मांडावी की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. असा सवालही निवेदनातून उपस्थित करण्यात आला. 

निवेदन देताना पत्रकार गजानन कासावार, जब्बार चीनी, रामकृष्ण वैद्य, राजू तुराणकर, राजू गव्हाणे, शेख इकबाल, ज्ञानेश्वर बोनगिरवार, पुरुषोत्तम नवघरे, आकाश दुबे, जितेंद्र कोठारी, संदीप बेसरकर, परशुराम पोटे, राजेंद्र निमसटकर, दिगंबर चांदेकर, मोहम्मद मुष्ताक, मुन्ना बोथरा, श्रीकांत किटकुले, अजय कंडेवार इत्यादी पत्रकार उपस्थित होते.

हे देखील वाचा:

रविवारी 7 कोरोना पॉजिटिव्ह

हे देखील वाचा:

‘तिला’ झाली गर्भधारणा तरीही “हा” लग्न करेना

Leave A Reply

Your email address will not be published.