मुकुटबन ग्रा.प.उपसरपंचासह दहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

न्यायालयाच्या आदेशानुसार झाली कारवाई

जितेंद्र कोठारी, वणी: झरी तालुक्यातील मुकुटबन ग्राम पंचायतचे उपसरपंच अनिल कुंटावार व तंटामुक्त समिती अध्यक्ष रवींद्र कापनवार यांच्यासह गावातील 10 जणांवर छेडछाड, विनयभंग व दंगलीचा गुन्हा नोंद झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या आदेशाने रविवार 9 जानेवारी रोजी मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सदर घटना ही दोन महिन्या आधीची आहे. मात्र या प्रकरणी मुकुटबन पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार फिर्यादी महिलेच्या घराला लागून वाल्मिकी समाजाची 1550 स्के.फूट खुली जागा आहे. त्याजागेवर गेल्या अनेक वर्षांपूर्वी वाल्मिकी ऋषींची प्रतिमा स्थापित करण्यात आली होती. मात्र सदर प्लॉटच्या मालकी हक्कावरून वाल्मिकी समाज व फिर्यादीच्या कुटुंबात वाद सुरु आहे. 23 ऑक्टोबर 2021 रोजी वाल्मिकी जयंतीनिमित्त मुकुटबन येथील वाल्मिकी समाजाचे नागरिक प्रतिमेचे पूजन करण्यासाठी गेले असता फिर्यादी महिला व तिच्या पतीसोबत वाद झाला.

फिर्यादी महिलेनी त्याच दिवशी मुकुटबन पोलीस ठाण्यात उपसरपंच अनिल कुंटावार व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रवींद्र कापनवारसह 10 जणांविरुद्ध तक्रार दिली. धार्मिक आणि संवेदनशील विषय असल्यामुळे ठाणेदार अजित जाधव यांनी सायंकाळी दोन्ही पक्षच्या लोकांना ठाण्यात बोलावून समज दिली. त्यामुळे दोन्ही पक्षाने झाले गेले विसरून एकमेकांविरुद्ध तक्रार न देण्याचा निर्णय घेतला. असे असताना मात्र फिर्यादीने 30 ऑक्टो 2021 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे सदर प्रकरणाबाबत तक्रार केली. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून तक्रारीची दखल न घेतल्यामुळे फिर्यादी हिने झरीजामणी न्यायालयात प्रकरण दाखल केले.

न्यायालयाने प्रकरणाची चौकशी करून 3 जाने. रोजी मुकुटबन पोलिसांना प्रतिवादी अनिल कुंटावार, रवींद्र कापनवार, राजेश्वर कुंटावार, मधुकर जिनांवार, अंकुल गोनलावार, पोतन्ना मंदूलवार, संतोष मंदूलवार, गजानन कुंटावार, सत्यनारायण कुंटावार व सोकाराम मंदूलवार असे 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून उपविभागीय पोलीस अधिकारी मार्फत तपास करण्याचे आदेश दिले.

न्यायालयाच्या आदेशावरून दि. 9 जानेवारी रोजी वरील सर्व आरोपींविरुद्ध कलम 143, 146, 147, 149, 294, 323, 354, 506 नुसार मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार करीत आहे.

सखोल चौकशी करुन कारवाई करणार- एसडीपीओ
न्यायालयाच्या आदेशाने सर्व आरोपीविरुद्ध विविध कलमानव्ये गुन्हा नोंद करण्यात आले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांचे बयान घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल. सद्य कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
– संजय पुज्जलवार : उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी

हे देखील वाचा

संपत आली जवानी, तरी सासरा म्हणतोय माझी अधुरी कहाणी

Comments are closed.