शिवनाळा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, गावकरी संतप्त

डांबरीकरणाआधीच उखडला रस्ता, निकृष्ट दर्जाचे काम सुरू राहिल्यास आंदोलनाचा इशारा

सुरेश पाचभाई, बोटोणी: शिवनाळा पासून यवतमाळ हायवेला जोडणा-या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. 1 महिन्याआधी या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. बीबीएमचे काम झाले आहे. मात्र रस्त्याच्या कामात डांबराचे प्रमाण अत्यल्प असून रस्त्यावर टाकण्यात आल्याच्या भराची दबाई देखील झाली नाही. त्यामुळे रस्ता उखडायला सुरूवात झाली असल्याचा आरोप शिवनाळा येथील रहिवाशांचा आहे. रस्त्याचे काम असेच निकृष्ट दर्जाचे सुरू राहिल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा गावक-यांनी दिला आहे.

मारेगाव पासून सुमारे 9 किलोमीटर अंतरावर शिवनाळा हे छोटेसे गाव आहे. या गावात 100 टक्के आदिवासी समाजातील लोकवस्ती आहे. गावापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर यवतमाळ-चंद्रपूर हायवे आहे. 10 वर्षांआधी येथे रस्त्याचे काम करून शिवनाळा फाट्याला हायवेसोबत जोडले गेले होते. या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. त्यामुळे 1 वर्षांआधी जिल्हा परिषद तर्फे 4.80 किलोमीटरच्या कामाला सुरूवात झाली होती. त्यापैकी अर्धे काम झाले आहे.

अर्धे काम झाल्यानंतर उर्वरित सुमारे 2 किमीच्या कामाला 1 महिन्याआधी सुरूवात झाली. मात्र बीबीएमचे काम हे निकृष्ट दर्जाच्या होत असून डांबरीकरणाच्या आधीच रस्ता उखडून गिट्टी वर येत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या डागडुजीला सुरूवात झाली आहे. या रस्त्यावर टाकण्यात आलेल्या भराची दबाई योग्य प्रकारे झाली नाही, तसेच रस्त्याच्या कामासाठी अत्यल्प प्रमाणात डांबर टाकण्यात येत असल्यानेच सदर रस्ता हा निकृष्ट दर्जाचा तयार होत असल्याचा आरोप गावकरी करीत आहे.

निकृष्ट काम झाल्यास उपोषणाचा इशारा
शिवनाळा येथील नागरिकांना बाजार, शाळा, कॉलेज, व्यवसाय, नोकरी इत्यादीसाठी रोज याच मार्गाने मारेगाव येथे जावे लागते. अनेक वर्षांपासून हा रस्त खराब अवस्थेत होता. त्यामुळे गावक-यांनी त्रास सहन केला. मात्र आता या कामाला सुरूवात झाली असली तरी डांबराचा अपुरा वापर, भराची दबाई न करणे यामुळे गावकरी संतप्त झाले आहे. याबाबत गावक-यांची गावात बैठक झाली असून रस्त्याचे काम असेच सुरू राहिल्यास तीव्र आंदोलन करून काम थांबवले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. कामाच्या संदर्भात कनिष्ठ अभियंता यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

फोटोग्राफी: 

बोटोणी परिसरात हरबरा चांगलाच बहरला असून त्यामुळे शेत फुलले आहेत. फोटो: सुरेश पाचभाई

हे देखील वाचा:

संपत आली जवानी, तरी सासरा म्हणतोय माझी अधुरी कहाणी

मुकुटबन ग्रा.प.उपसरपंचासह दहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

Comments are closed.