जितेंद्र कोठारी, वणी: जिनिंग व्यवस्थापकाला मारहाण करून भर दुपारी 45 लाखांची लूटमार प्रकरणी अटक मुख्य आरोपी बाबूलाल बिश्नोई याला पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली होती. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला 20 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पोलीस कोठडी दरम्यान दरोड्याच्या गुन्ह्यात सहभागी इतर चार ते पाच आरोपी, लुटण्यात आलेली 45 लाखाची रक्कम तसेच गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेले चारचाकी वाहनांबाबत पोलिस आरोपीला विचारपूस करणार आहे. जिनिंग मालक यांच्या घऱी गेल्या वर्षी लाखोंची चोरी झाली होती. यातही हीच मोडस ऑपरेंडी (कार्यप्रणाली) वापरली गेली होती. त्यामुळे या चोरीत देखील हेच आरोपी होते का याचा शोध पोलीस घेत आहे.
राजस्थान येथील जोधपूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी आरोपी बाबूलाल बिश्नोई मागील 15 वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यात वास्तव्यास आहे. वणी, मारेगाव व हिंगणघाट भागात असलेल्या जिनिंग प्रेसिंग कारखान्यात लेबर सप्लाय तसेच प्रेसिंग युनिट चालविण्याचे कंत्राटी काम बाबूलाल करीत होता. मेहनत व प्रामाणिकपणामुळे बाबूलाल यांनी जिनिंग मालकांचे विश्वास संपादन केला. बाबूलालच्या हाताने लाखों रुपयांची रक्कम इकडे तिकडे पाठवायला जिनिंग मालकांना कधीही भीती वाटली नाही.
निळापूर ब्राह्मणी मार्गावरील इंदिरा एग्जिम प्रा.लि. या जिनिंग फॅक्टरीतही बाबूलाल यांनी काम केले होते. त्यामुळे जिनिंग मालकासह तेथील स्टाफचाही बाबूलालवर विश्वास होता. नेमका याच विश्वासाचा फायदा घेऊन आरोपी बाबूलाल यांनी जिनिंगमधील रोख व्यवहाराबाबत पूर्ण माहिती मिळविली. 20 मार्च 2021 रोजी कापसाचे चुकारे करण्यासाठी जिनिंग व्यवस्थापक मनीष जंगले हे बँकेतून 45 लाख रुपये काढून जिनिंगमध्ये जात होते.
दरम्यान एका कारमधून आलेल्या 3 ते 4 दरोडेखोरांनी अहफाज जिनिंग समोर मनीष जंगले याची दुचाकीला धडक देऊन त्याच्या जवळील पैशानी भरलेली बॅग हिसकावून पोबारा केला. तपासादरम्यान पोलिसांना वरोरा मार्गावर एका बार समोर बेवारस उभी असलेली (RJ19 UC 6190) क्रमांकाची बोलेरो जीप आढळली. पोलिसांनी जिनिंग मधील कामगारांची माहिती तसेच बोलेरो जीपबद्दल माहिती काढली असता संशयाची सुई बाबूलालच्या दिशेने वळली. घटनेनंतर बाबूलाल बिश्नोई तसेच वणी येथील एका गॅस एजन्सीमध्ये कार्यरत दोन राजस्थानी कर्मचारी शहरातून गायब झाल्याचेही पोलीस तपासात आढळले.
आरोपींच्या शोधकामी पोलीस पथकाने राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात 12 दिवस तळ ठोकला. मात्र बाबूलाल व त्याचे साथीदार पोलिसांच्या हाती लागले नाही. अखेर 14 एप्रिल रोजी बाबूलाल हा एका लग्नात आपल्या गावी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कडेवार, वणी पोलीस डीबी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, पो.का. गजानन डोंगरे व उल्हास कुरकुटेच्या पथकाने जोधपूर जिल्ह्यातील लोहावत गावातून बाबूलाल बिश्नोई याला शिताफीने अटक केली.
चोरी आणि दरोड्यातील आरोपी एकच ?
इंदिरा एग्जीम प्रा.लि. चे मालक अनिल अग्रवाल यांच्या घरी एक वर्षांपूर्वी लाखों रुपयांची चोरी झाली होती. त्या चोरीच्या घटनेतसुद्दा पांढऱ्या रंगाची कारचा वापर करण्यात आला होता. चोरी करणाऱ्या आरोपीनेच दरोडा टाकल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे आरोपिकडून दरोड्यासोबतच चोरीच्या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
वणी बहुगुणी हे देखील वाचा: