निर्गुडा नदी दुथडी भरून वाहू लागली, नदीप्रेमींचे पावले नदीकडे
दमदार पावसामुळे पिकांना मिळाली संजीवनी, शेतकरी सुखावला
तालुका प्रतिनिधी, वणी: मोठी विश्रांती घेऊन पुन्हा पावसाने वणी उपविभागात दमदार बॅटींग केली. त्यामुळे माना टाकलेल्या पिके पुन्हा प्रफुल्लीत झाले आहे. गेल्या पंधरवड्यात पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे पिके कोमेजून जाऊ लागली होती. मात्र नुकत्याच झालेल्या दमदार पावसाने पिकांना संजीवनी मिळाली आहे. यासह परिसरातील नदी, नाले, तलावही ही तुडुंब भरले आहे. शनिवारी झालेल्या पावसामुळे निर्गुडा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी वणीकरांचे पावले नदी कडे वळू लागले आहे.
तालुक्यात यंदा मृग नक्षत्राच्या प्रारंभी जोरदार पावसाला सुरुवात झाली. जून महिन्याच्या दुस-या आठवड्यात सलग पाऊस झाला. परिणामी शेतकऱ्यांनी घाईगडबडीत खरीप पिकांची लागवड केली. सततच्या पावसाने समाधानकारक प्रकारे बियाणे उगवले. यामुळे शेतकरी आनंदित झाले. पण 17 जून पासून पावसाने दगा दिला. तालुक्यातील काही भागात 27 जून, 4 जुलैला तुरळक प्रमाणात खंडित पाऊस पडला. मात्र, सार्वत्रिक पाऊस पडला नाही.
पावसाअभावी व तीव्र उन्हामुळे शिवारातील उगवलेली पिके कोमेजली. दरम्यान कापूस पिकांत खाडे भरणे, निंदन, डवरणी करण्याच्या कामांना वेग आला होता. परंतु पावसाअभावी पिकांना रासायनिक खते देणं, तणनाशकांची फवारणी करणे आदी कामे खोळंबली होती. जवळपास कापसाची लागवड साधली.
केवळ उन्हाळ्यात ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी केलेल्या शेतातील कपाशीची बहुतांश टोवणी जोरदार पावसाने बाद गेली. खाडे भरणी करून झाडांची संख्या वाढविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. सोयाबीन पिकाची पेरणी साधली असून पीक डवरणीचे कामे सुरू आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या सार्वदूर पावसाने शेतकऱ्यांच्या प्रफुल्लित केले. ऑआता रासायनिक खते देण्याच्या कामाला वेग आला आहे. पुनर्वसू नक्षत्रात पडलेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे.
नदीप्रेमींची पावले वळले निर्गुडा नदीकडे
शनिवारी झालेल्या पावसामुळे वणी शहराची जीवनदायिनी अशी ओळख असलेली निर्गुडा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. हे विलोभनीय दृष्य पाहण्यासाठी नदीप्रेमींची पावले सध्या नदीकडे वळू लागले आहे. अनेक नदी प्रेमी तसेच निसर्गप्रेमी लोक या ठिकाणी दुचाकी, चारचाकीने जात आहे. तिथे जाऊन सेल्फी व फोटो काढून आनंद लुटत आहे. या पावसाळ्यात पहिल्यांदाच नदी अशा पद्धतीने दुथडी भरून वाहत असल्याने नदीप्रेमी आनंद व्यक्त करीत आहे. नदीच्या विलोभनीय दृष्याचा सेल्फी किंवा फोटो घेताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
फोटो साभार – प्रमोद लोणारे
हे देखील वाचा:
पिवरडोल वाघाच्या हल्ल्या प्रकरणी लिखीत आश्वासनानंतर मृतदेह उचलला