पिवरडोल वाघाच्या हल्ल्या प्रकरणी लिखीत आश्वासनानंतर मृतदेह उचलला

मृतकाच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी, 4 दिवसात वाघाचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन

0

सुशील ओझा, झरी/ पाटण प्रतिनिधी: पिवरडोल वाघाचा हल्ला प्रकरणी ठोस आश्वासन दिल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही अशी कठोर भूमिका ग्रामस्थांनी उचलल्यानंतर अखेर प्रशासनातर्फे मृतकाच्या कुटुंबीयांना लिखित आश्वासन देण्यात आले. यात शासकीय नियमानुसार मृतकाच्या कुटुंबीयांना त्वरित 15 लाखांची आर्थिक मदत, मृतकाच्या बहिणीला शासकीय नोकरी इ आश्वासने देण्यात आले आहे. 

सकाळी 10.15 वाजताच्या सुमारास गावकरी व वनविभागाच्या कर्मचा-यांनी वाघाला हुसकावून लावले. घटनास्थळी अविनाश लेनगुरेचा मृतदेह अतिशय छिन्न विछिन्न अवस्थेत आढळून आला. त्यानंतर मृतकाच्या कुटुंबीयांनी चार तासांपासून वाघाला हुसकावण्यात का आले नाही असा सवाल उपस्थित करीत जोपर्यंत मागण्या मान्य केल्या जात नाही तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही अशी भूमिका घेतली.

वनविभागाचे एसीएफ लोणकर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या उपस्थितीत मृतकाच्या कुटुंबीयांशी चर्चा करण्यात आली. यात लेनगुरे यांच्या कुटुंबियातील एका व्यक्तीला नोकरी  15 लाख रुपयांची शासकीय मदत इत्यादी मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर मृतदेह उचलण्यात आला.

काय दिलीत प्रशासनाने आश्वासने?
हल्ला करणा-या वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी (रेस्क्यू) चार दिवसात प्रस्ताव सादर केला जाईल. मृत व्यक्तीच्या बहिणीस आठ दिवसात अस्थायी नोकरी देण्यात येईल. वाघाच्या नियंत्रणाकरीता ग्रामस्थांचा दल बनवण्यात येईल. वन विभागाच्या जागा निघताच त्यात मृतकाच्या बहिणीला प्राधान्य देण्यात येईल. संवेदशशील भागात जंगलाच्या कडेला तारांचे कुंपण केले जाईल, शासनाच्या नियमानुसार त्वरित सानग्रह मदत दिली जाईल. वाघाचा धोका असलेल्या भागात वनकर्मचारी व वनमजूर यांची संयुक्त ड्युटी लावण्यात येईल.

पिवरडोल शेतशिवारात शौचास गेलेल्या अविनाश पवन लनगुरे (17) या तरुणाचा वाघाने फडशा पाडला होता. सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. वाघ शिकारीजवळच असून शिकार खात आहे कळताच हा थरार बघण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सुमारे 2 ते 3 हजारांची गर्दी याठिकाणी गोळा झाली होती.

वाघाला पाहण्यासाठी व व्हिडीओ शुटिंग करण्यासाठी बघ्यांची एकच झुंबड उडाली होती. अखेर 4 तासानंतर सकाळी 10.15 वाजताच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचा-यांना वाघाला हुसकावण्यात यश आले. दरम्यान वाघ तीन ते चार तास शिकार खात असताना वाघाला हुसकावण्यात का आले नाही? असा सवाल करत प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळत पर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका अविनाशचे कुटुबींय व गावक-यांनी घेतली होती.  

हे देखील वाचा:

वणीत साई हॉस्पिटलमध्ये 24×7 अतिदक्षता विभाग सुरू

गोंडबुरांडा येथे कीटकनाशक पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या

तरुणाचा फडशा पाडणा-या वाघाला हुसकावण्यात यश

Leave A Reply

Your email address will not be published.