सावधान… राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता !

लस घेण्यात नागरिकांमध्ये अनुत्साह, लस घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

0

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असतानाच डेल्टा प्लस या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटनं डोकं वर काढलं आहे. नवीन डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे महाराष्ट्रात येत्या तीन-चार आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत या व्हेरिएंटचे 21 रुग्ण आढळलेत. त्यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याचा धोका असल्याचा इशारा केंद्र सरकारने राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान कोरोनावर सध्यातरी लस हाच एकमेव उपाय असल्यावरही लशीबाबत अद्यापही सर्वसामान्यांमध्ये अनुत्साह दिसून येत आहे. यामुळे कोरोनाची तिसरी लाट आली तर प्रशासनाची डोकेदुखी वाढू शकते. दरम्यान तिस-या लाटेची शक्यता लक्षात घेता खबरदारी म्हणून वणी शहरात कालपासून विशेष पथक कार्यरत झाले आहे.

कोरोनाची ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत 20 दिवसांपूर्वीच राज्य सरकारनं अनलॉकचा निर्णय घेतला होता. मात्र बाजारपेठांमध्ये नागरिकांची तुफान गर्दी आणि डेल्टा प्लसचा धोका पाहता राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. सध्याच्या अनलॉक पद्धतीत राज्य सरकारकडून बदल करण्यात आले आहे. नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी नियमांत अधिक कठोरता आणून अत्यावश्यक दुकानं वगळता इतर दुकानांच्या वेळाही कमी करण्यात आली आहे.

सध्या लस हाच एकमेव उपाय
कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये वॅक्सिनची कमतरता असताना नागरिकांनी लशीसाठी एकच गर्दी केली होती. मात्र आता लस मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना आता मात्र लशीबाबतचा नागरिकांचा उत्साह ओसरला असून ज्या वेगाने वॅक्सिनेशन होणे गरजेचे आहे त्याचा वेग थंडावला आहे. बीबीसी वर्ल्डच्या एका रिपोर्टनुसार सध्या लंडनमध्ये कोरोनाची तिसरी लाट आलेली आहे. यात ज्या व्यक्तींनी वॅक्सिन घेतली नाही अशा व्यक्तींना रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली आहे. दरम्यान तिथे दोन लस दिल्यानंतर बुस्टर म्हणून तिसरी लस देण्यात येत असल्याचेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान प्रशासनाने अधिकाधिक नागरिकांनी वॅक्सिन घेण्याचे आवाहन केले आहे.

काय आहे डेल्टा प्लस व्हेरिएंट ?
कोणताही विषाणू आपले रूप बदलत असतो. त्या बदलत्या रुपाला संशोधक नाव देतात. कोरोना विषाणूच्या बदलत्या रुपाला डेल्टा आणि डेल्टा प्लस असे नाव देण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार डेल्टा व्हेरियंटप्रमाणेच डेल्टा प्लस रोगप्रतिकारशक्तीला चकवणारा आहे. कोरोनाविरोधी लस आणि संसर्गामुळे निर्माण झालेली रोगप्रतिकारशक्ती दोघांनाही चकवण्याची क्षमता ‘डेल्टा प्लस’ मध्ये असण्याची शक्यता आहे. डेल्टा विषाणू हा अधिक संसर्गकारक आहे. त्यामुळे कुटुंबातील सर्व व्यक्तींमध्ये चटकन पसरतो. तो आधीच्या स्ट्रेनपेक्षा शरीरात लवकर पसरतो. त्यामुळे आजाराची लक्षणे चार ते पाच दिवसांत दिसू लागतात. या स्ट्रेनचा संसर्ग झाल्यास औषधोपचार हे कोरोनाच्या उपचारपद्धतीसारखेच आहेत. मास्क वापरणे, हात धुणे आणि गर्दीत न जाणे ही त्रिसूत्री नियम पाळणे गरजेचे आहे.

नवीन नियमावलीनुसार आता अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहू शकेल. तर शनिवार रविवार इतर दुकाने पूर्णपणे बंद ठेवावी लागेल. मॉल्स, थिएटर, सिनेमागृह, नाट्यगृह पूर्णपणे बंद राहतील. रेस्टॉरंट, हॉटेल, उपहारगृह सोमवार ते शुक्रवार 50% बैठक क्षमतेने सायं. 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, सायं.4 वाजेनंतर व शनिवारी आणि रविवारी फक्त टेक अवे/पार्सल सर्व्हिस आणि होम डिलेव्हरी सेवा सुरू राहील. कृषि सेवा दुकाने परवानगी दिलेल्या वेळेत सूरु राहतील. ई-कॉमर्स- साहित्य व सेवा पूर्वीप्रमाणे नियमित सुरू राहतील.

सामाजिक मेळावे, सांस्कृतिक करमणूक 50% बैठक क्षमतेने सोमवार ते शुक्रवार सायं. 4.00 वा. पर्यंत सुरू राहतील. लग्न समारंभ फक्त 50 लोकांच्या मर्यादेतच करता येतील. तर अंत्यसंस्कार विधीसाठी फक्त 20 लोकांना परवानगी राहणार आहे। बांधकामाकरीता केवळ ऑनसाईट मजूर राहणाऱ्या ठिकाणी किंवा सायं.4 वाजेपर्यंत कामगारांनी कामाचे ठिकाण सोडले पाहिजे या अटीवर परवानगी असेल. व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर व,स्पा सायं. 4 वाजेपर्यंत 50 % क्षमतेने सुरु राहतील. परंतू, गि-हाईकांना पूर्वनियोजित वेळ ठरवूनच यावे लागेल. तसेच वातानुकूलन यंत्रणेचा वापर करता येणार नाही. जमावबंदी सांय. 5.00 वा. पर्यंत व संचारबंदी सायं 5.00 वा. नंतर लागू राहील.

हे देखील वाचा:

टाकळी-दाभा दरम्यान ट्रकचा अपघात, पुलाच्या कठड्यात अडकला क्लिनर

धडाकेबाज कारवाई करणा-या विशेष पोलीस पथकाचे अवघ्या 22 दिवसातच विसर्जन

Leave A Reply

Your email address will not be published.