गोकुळ नगर येथील विनर्स बार चोरट्यांनी फोडले

विविध ब्रँडची विदेशी दारू लंपास, 2 आरोपींना अटक

1

विवेक तोटेवार, वणी: शहरातील गोकुळनगरस्थित विनर्स नामक बार दोन दिवसांआधी चोरट्यांनी फोडले. शनिवारी याबाबतची तक्रार बार मालकाने वणी पोलिसात केली होती. वणी पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घेत दोन आरोपींना अटक केली. आरोपींकडून सुमारे 66 हजारांची विदेशी दारू हस्तगत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही आरोपी बार असलेल्या परिसरातीलच आहे.

वागदरा रोडवर गोकुळ नगरमध्ये विनर्स नावाचे बार आहे. काही दिवसांआधी हा बार अभिजीत अरुणराव सातोकर रा. देशमुखवाडी यांनी एका व्यक्तीकडून विकत घेतला होता. लॉकडाऊनच्या काळात बारचे रिनोव्हेशन करून बार सुरु करण्याचा त्यांचा विचार होता. लॉकडाऊन उठताच गुरुवारी दिनांक 10 जून रोजी त्यांनी सुमारे 2 लाखांचा विदेशी दारुचा माल बारमध्ये भरला.   

गोकुळ नगर परिसरातच आरोपी रामेश्वर उर्फ रामा मनोहर साळुंखे (32) व आरोपी राजू नारायण मोरे (34) राहतात. सदर बार बंद राहत असून बारमध्ये माल भरणे सुरू असल्याचे त्यांनी बघितले होते. बार बंद असल्याचा फायदा घेत त्यांनी दोन दिवसांआधी बारच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला व बारमध्ये चोरी केली.

माल भरल्याच्या दोन दिवसांनी काल शनिवारी बारमालक अभिजीत सातोकर  एका कर्मचा-यासह बारमध्ये जाताच त्यांना बारमध्ये चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी शटर उघडून आत जाऊन बघितले असता त्यांना बारमधला 67 हजारांचा माल चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबतची वणी पोलिसात दिली. तक्रारीवरून वणी ठाण्याचे डीबी पथक आरोपीचा शोध घेत होते.

रविवारी 13 जून रोजी सकाळी डीबी पथकाला खबर मिळाली की, आरोपी रामेश्वर उर्फ रामा मनोहर साळुंखे (32) व राजू नारायण मोरे (34) दोघेही राहणार गोकुळनगर हे दोघेही एका बंड्यावर असून त्याच ठिकाणी त्यांनी विनर्स बार येथून चोरी केलेला माल लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. माहितीवरून डीबी पथकाने सकाळी धाड टाकली व दोन्ही आरोपींना अटक केली.

त्यांच्याकडे बारमधून चोरी केलेला विविध ब्रँडच्या विदेशी दारूचा साठा आढळून आला. सदर माल हा सुमारे 65,805 रुपयांचा आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर भादंविच्या कलम 380, 457 नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान यातील एक आरोपी रामेश्वर याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तर राजू मोरे याला बेल मंजुर झाली आहे. 

सदर कारवाई पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवर, ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी प्रमुख गोपाल जाधव, सुदर्शन वनोळे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, पंकज उंबरकर, हरींद्र भारती, दीपक वांड्रसवार व चालक प्रफुल नाईक यांनी केली.

हे देखील वाचा:

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये होलसेल दरात खरेदी करा फवारणी पम्प

स्थानिक कलाकारांची शॉर्ट फिल्म ‘रेडियो 1947’ चा टिझर प्रकाशित

Leave A Reply

Your email address will not be published.