मारेगाव: शहरातील वणी रोडवरील ए वाय हे देशी दारूचे दुकान चोरट्यांनी फोडले. बुधवारी रात्री ही घटना घडली. या चोरीत 1 लाख 90 हजारांची रोख रक्कम व 35 हजारांचे दुकानाचे साहित्य असे एकूण सुमारे सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. याबाबत दुकानाच्या कर्मचा-यातर्फे अज्ञात आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, मारेगाव येथे वणी रोडवर अक्षरा बारच्या मागे ए वाय नावाची देशी दारुची भट्टी आहे. सदर दुकान हे यवतमाळ येथील आरती योगेश जयस्वाल यांच्या मालकीचे आहे. या दुकानाचे सर्व व्यवहार त्यांचे नातेवाईक नीलेश जयस्वाल पाहतात. त्यांच्या दुकानात संतोष मनोहरलाल जयस्वाल (34) रा. चिखलगाव ता. वणी हा काम करतो. संतोष रोजचा दारूविक्रीचा गल्ला जमा करून तीन चार दिवसांनी ती रक्कम नीलेश जयस्वाल यांच्या अकाउंटवर जमा करतो.
बुधवारी दिनांक 30 जून रोजी नीलेश यांनी संतोषला दारुच्या विक्रीतून आलेल्या रकमेतील 1 लाख 30 हजार रुपये दुकानाच्या रिनिव्हलसाठी काढून ठेवण्यास सांगितले. त्यानुसार संतोषने दारूविक्रीतून आलेले 60 हजार रुपये व रिनिव्हल साठी 1 लाख 30 रुपये असे एकूण 1 लाख 90 हजार रुपये दुकानच्या कॅश काउंटरमध्ये ठेवले. दुपारी 4 वाजता दुकान बंद करून तो चिखलगाव येथील त्याच्या घरी गेला.
सकाळी संतोष दुकान उघडण्यासाठी गेला असता त्याला संपूर्ण दुकान फोडलेले आढळले. दुकानाच्या टिना व शेड चोरट्यांनी पळवल्या होत्या. त्याने आत जाऊन बघितले असता दुकानाच्या कॅश काउंटरमध्ये ठेवलेले 1 लाख 90 हजार रुपयेही चोरट्यांनी लंपास केलेले आढळून आले. या संपूर्ण चोरी चोरट्यांनी 1 लाख 90 हजारांची रोख रक्कम, 35 टिना व शेडचे ऍन्गज ज्याची किंमत 35 हजार रुपये असा एकूण सुमारे 2 लाख 25 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
संतोषने तातडीने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 380, 457, 461 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकऱणाचा तपास ठाणेदार जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात पोउनि अमोल चौधरी करीत आहे.