वणीतील रविनगरमध्ये धाडसी चोरी… हिरे, सोनं व रोख रक्कम लंपास

सुमारे 2 लाखांची चोरी, नववर्षाची सुरुवातच धाडसी घरफोडीने

वणी बहुगुणी डेस्क: वणीतील रविनगर येथे धाडसी घरफोडी झाली. यात चोरट्यांनी 15 हजार रुपये नगदी आणि हिरे, सोने आणि चांदीचे दागिने असा एकूण 1.89 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. मंगळवारी दिनांक 2 जानेवारी रोजी ही घरफोडी उघडकीस आली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. शहरातील चोरीचे सत्र काही केल्या थांबत नाहीये. त्यातच नववर्षाची सुरुवातच धाडसी घरफोडीने झाली असल्याने वणीकरांची चिंता वाढली आहे.  

सविस्तर वृत्त असे की जितेशकुमार श्रीकृष्णमुरारी पांडे (40) हे मुळचे बिहार येथील रहिवासी असून ते रविनगर वणी येथे एका घरी भाड्याने राहतात. ते मुकुटबन येथील रिलायन्स कंपनीत नोकरी करतात. रविवारी दिनांक 28 डिसेंबर रोजी ते उत्तर प्रदेश येथील वृंदावण येथे कुटुंबासह देवदर्शनासाठी गेले होते. मंगळवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास घरी परत आले. तेव्हा त्यांना घराच्या मुख्य लाकडी दाराला लावलेले कुलूप लावलेले दिसले मात्र त्याचा साखळी कोंडा तुटलेले आढळला. तर यावेळी दरवाजा उघडा होता.

जितेश कुमार यांनी घरात प्रवेश केला असता त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त आढळले. दोन्ही बेडरुममध्ये असलेले चारही कपाट उघडे होते. या धाडसी चोरीत चोरट्यांनी एक सोन्याचे मंगळसूत्र (20 हजार), हि-याचा नेकलेस (50 हजार), सोन्याची 15 ग्रॅमची चैन (30 हजार), 20 ग्रॅमची सोन्याची मांगटिका (35 हजार), 3 ग्रामची सोन्याची नथ (2 हजार), 14 ग्रॅमचे सोन्याचे झुमके (30 हजार), चांदिचे चाळ (5 हजार), इतर चांदीचे दागिने 2 हजार व 15 हजार रुपये नगदी असा एकूण 1 लाख 89 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. 28 डिसेंबर ते 2 जानेवारीच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

 

घरफोडीचे सत्र थांबता थांबेना
शहरात गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने घरफोडीच्या घटना घडत आहे. चोरट्यांद्वारा कधी घर तर कधी दुकान फोडली जात आहे. काही काळ अवकाश घेतल्यानंतर आता पुन्हा ही धाडसी घरफोडी उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपासून  शहरात इतक्या चोरी होत असतानाही अद्याप एकही प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे वणीकर चांगलेच दहशतीत आले आहे. घर बंद करून जात असल्यास याची पोलीस स्टेशनला माहिती द्यावी. तसेच बाहेरगावी जाताना घरात मौल्यवान वस्तू ठेवू नये असे आवाहन वारंवार केले जाते.

पोलिसांनी फिर्यादी जितेशकुमार पांडे यांच्या तक्रारीवरून याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 380 व 457 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

वारंवार मजुरीचे पैसे मागितल्याने मजुरावर विळ्याने हल्ला

उद्या लालपरीची वाहतूक होणार विस्कळीत? संपाचा वणीकरांना फटका

Comments are closed.