….अन् गाडी तिथेचे ठेऊन चोरट्यांनी काढला पळ

कुंभारखनी खाणीत चोरट्यांची झाली पंचायत, 20 हजारांचा केबल लंपास

विवेक तोटेवार, वणी: 2 दुचाकी घेऊन 4 चोरटे बंद पडलेल्या खाणीत चोरी करण्यासाठी गेले. तिथे हात साफ करण्यात ते यशस्वीही झाले. आता तिथून पळून जायच्या वेळीच त्यांच्या मागे 3 सेक्युरिटी गार्ड धावले. यात दोघे चोरटे पळून गेले. पण इतर  दोघांना गाडी सुरू करण्याचाही वेळ भेटला नाही. त्यामुळे त्यांची चांगली पंचायत झाली व पकडले जाण्याच्या भीतीने ते गाडी तिथेच ठेऊन पसार झाले. कुंभारखनी येथे शुक्रवारी मध्यरात्री (शनिवारी) ही घटना घडली. या प्रकरणी गाडी सापडल्याने सर्व चोरीचा बट्ट्या  झाला आहे. गाडी क्रमांकावरून आता चोरटेही लवकरच हाती येण्याची शक्यता आहे.

सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील कुंभारखनी येथील कोळसा खाण ही बंद अवस्थेत आहे. या ठिकाणी भंगार चोरट्यांची अनेक दिवसांपासून नजर आहे. बंद माईन्समधून साहित्य चोरी जाऊ नये म्हणून या ठिकाणी सिक्युरिटी गार्डची व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री 2.30 वाजताच्या सुमारास 4 चोरट्यांनी मागच्या बाजूने माईन्समध्ये प्रवेश केला. त्यांनी बाजूलाच असलेली आरमर्ड पावर केबल (तांब्याची तार असलेली) चोरून नेण्याचा प्रयत्न केला. यात ते यशस्वीही झाले. मात्र तिथे असलेले सिक्युरिटी इंचार्ज रामप्रसाद साधू यादव व त्यांच्या 2 साथीदारांना चोरी होत असल्याचा संशय आला. त्यांनी बघितले असता त्यांना चोरटे चोरी करीत असताना आढळले. 

तिन्ही गार्डने वेगाने चोरट्यांचा पाठलाग केला. यातील पुढे असलेले दोघे चोरटे हे दुचाकीवर केबल घेऊन पसार झाले. तर दोघे हे ज्युपिटर या मोपेडवर (MH29 BH 1722) बसण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र सेक्युरिटी गार्ड जवळ आल्याने त्या दोन्ही चोरट्यांना गाडी सुरू करण्याचाही वेळ मिळाला नाही व त्यांनी गाडी तिथेच टाकून पळ काढण्यातच धन्यता मानली. 

या प्रकऱणी चोरट्यांनी 20 हजारांच्या केबलची चोरी केली आहे. सिक्युरिटी इंचार्ज यादव यांच्या तक्रारीवरून वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भादंविच्या कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास अनंता इतपाते करीत आहे. चोरट्यांची चोरी तर यशस्वी झाली आहे. मात्र गाडी तिथेच राहल्याने चोरट्यांची चांगलीच पंचायत झाली व ते पुरावा सोडून पळून गेले. 

हे देखील वाचा:

प्रेमात पडून हाताशी धरला ‘यार’, नव-याच्या हत्याकांडात बायकोच सूत्रधार

अखेर दिड महिन्यांनी अवतरल्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेविका

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.