धक्कादायक: वाघाने पाडला 3 गायींचा फडशा
रांजी कोसा शिवारातील घटना, घोन्सा परिसरात वाघाची दहशत
दिलीप काकडे, घोन्सा: घोन्सा परिसरात वाघाच्या हल्ल्यात 3 गायी ठार झाल्या आहेत. आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घोन्सा परिसरातील सुर्ला गावाजवळील सोनेगाव-सुर्ला मधील आसन शिवारात ही घटना घडली. वाघाच्या हल्ल्यात चंद्रभान मेश्राम यांच्या दोन गायी तर आनंदराव आत्राम यांच्या एका कालवडाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे एकाच वेळी वाघाच्या हल्लात तीन जनावरे ठार झाल्याची ही परिसरातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे वाघिणीसह तिच्या बछड्यांनीही हल्ला केला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
चंद्रभान मेश्राम व आनंदराव आत्राम हे दोघेही सुर्ला येथील रहिवाशी आहेत. बुधवारी दिनांक 29 डिसेंबर रोजी त्यांचे गायी चरण्यासाठी गुराखी घेऊन गेला होता. संध्याकाळच्या सुमारास मेश्राम यांच्या दोन गायी व आत्राम यांच्या मालकीचे कालवड बेपत्ता असल्याचे आढळून आले. रात्री त्यांनी परिसरात शोध घेतला. मात्र गायींचा शोध लागला नाही.
सकाळी पुन्हा बेपत्ता गायींचा व कालवडाचा शोध घेत असताना त्यांना मारेगाव वनविभागाच्या अख्यारित येणा-या सुर्ला जवळील रांजी कोसा शिवारात हे तिन्ही जनावरे वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याचे आढळून आले. वन विभागाला याची माहिती देण्यात आली आहे. वृत्त लिहे पर्यंत वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास वाघाने हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याआधीही परिसरात वाघाने जनावरांवर हल्ला केला आहे. मात्र वाघाच्या हल्ल्यात एकाच वेळी 3 जनावर ठार झाल्याची परिसरातील ही पहिलीच घटना आहे.
वाघिणीने बछड्यासह हल्ला केल्याचा अंदाज
एकाच वेळी एका वाघाला तीन जनावरांवर हल्ला करणे अशक्य आहे. त्यामुळे वाघिणीने तिच्या बछड्यासह हल्ला केला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. परिसरात वाघिणीचा बछड्यासह वावर आहे. मात्र आता तिचे बछडे मोठे झाले आहे. त्यामुळे एकापेक्षा अधिक वाघाने हल्ला केल्याचा अंदाज आहे. दरम्यान दोन वाघांच्या पायाचे ठसे घटनास्थळी आढळून आले आहे. तर 3 वाघांनी हल्ला केला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. चार दिवसांआधीच आसन शिवारात वाघाच्या हल्ल्यात एक गाय ठार झाली होती. त्या घटनेची शाई वाळत नाही तोच एकाच दिवशी वाघाने तिन गायींचा फडशा पाडला. त्यामुळे परिसरातील शेतकरी दहशतीत आले आहे. वनविभागाने त्वरित वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक करीत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.