थरार….! वाघीण आणि शेतकरी विरकुंडच्या जंगलात आमनेसामने

विरकुंड शिवारात रंगला थरार... परिसरात वाघिणीचा बछड्यांसह वावर

श्रीवल्लभ सरमोकदम, वणी: शेतात जाताना एका शेतक-याला अचानक बाजूला एक वाघीण दिसली… वाघीण बघताच तो जागेवरच स्तब्ध झाला… दोघांची नजरानजर झाली… हा खेळ काही क्षण सुरू होता… मात्र अचानक वाघिणीने डळकाळी फोडली…. शेतकरी लगेच बाजुच्या झाडावर चढला… मात्र वाघिणीने काही पिच्छा सोडला नाही… ती झाडाखाली घिरक्या घेत होती… अखेर या शेतक-याची गावक-याच्या मदतीने सुटका झाली. ही थरारक घटना आज दुपारी तालुक्यातील विरकुंड शिवारात घडली. यात शेतकरी जरी थोडक्यात बचावला असला तरी या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याचे कारण ही तसेच आहे. कारण वाघीण एकटीच नाही तर ती तिच्या बछड्यांसह होती.

सविस्तर वृत्त असे की विशाल भाऊराव ठाकरे (35) हे मारेगाव (कोरंबी) येथील रहिवाशी आहे. त्यांचे विरकुंड शिवारात शेत आहे. आज मंगळवारी दिनांक 28 सप्टेंबर रोजी ते नेहमी प्रमाणे 11 वाजताच्या सुमारास शेतात जाण्यासाठी निघाले. विरकुंड गावाच्या मागच्या भागात जंगल परिसर आहे. विशाल ठाकरे यांच्या शेतात जाण्याचा रस्ता देखील विरकुंड जंगलातील पायवाटेतून जातो. शेताच्या रस्त्यावरच जंगलाच्या भागात एक ओढा आहे. दरम्यान दुपारी 11.30 वाजताच्या सुमारास शेताच्या दिशेने जात असताना विशालला अचानक शेताच्या रस्त्यात लागणा-या ओढ्याच्या पात्रात एक पट्टेदार वाघिण आढळली.

वाघिणीला बघताच विशाल स्तब्ध झाला. दरम्यान वाघिणीची नजरही विशालवर पडली होती. वाघीण आणि विशाल यांच्यातील अंतर अवघे 10 ते 15 फुटांचे होते. जेव्हा वाघांसमोर नजरानजर होते तेव्हा कोणतीही हालचाल केली जात नाही, हे तंत्र विशालला माहिती होते. त्यामुळे तो स्तब्ध होऊन वाघिणीकडे बघत होता. हा खेळ काही क्षण चालला. दोघे ही एकमेकांकडे बघत होते. दरम्यान वाघिणीने डरकाळी फोडली.

डरकाळी फोडणे म्हणजे वाघांनी आक्रमक होण्याचे चिन्ह मानले जाते. त्यामुळे वाघिणीने जशी डरकाळी फोडली तसंच विशालने बाजूला नजर टाकली. त्यावेळी त्याला बाजुला एक पळसाचे झा़ड दिसले. विशालने लगेच पळसाच्या झाडाकडे धाव घेतली व तो लगेच झाडावर चढला. विशालला पळताना पाहून वाघिणही त्याच्या मागे धावली. मात्र तोपर्यंत विशाल झाडावर चढला होता.

मोबाईलने वाचवला जीव
झाडावर चढल्यावर वाघिण परत जाईल अशी अपेक्षा विशालला होती. मात्र वाघिणीने झाडाभोवती घिरट्या घालण्यास सुरुवात केली. दरम्यान विशालला खिशात संयोगाने मोबाईल आणि सिममध्ये कव्हरेज होते. त्याने मदतीसाठी तातडीने विरकुंड आणि मारेगाव (कोरंबी) येथील परिचयांच्या लोकांना कॉल करून बोलावले. विशाल झाडावर जीवन मृत्यूशी खेळतोय हे कळताच दोन्ही गावातील लोक लाठी, काठी, फटाके घेऊन घटनास्थळी रवाना झाले.

दरम्यान वाघिणीनेही हार मानली नव्हती. तिचे झा़डाखाली घिरट्या घालणे सुरूच होते. काही वेळातच विरकुंड आणि मारेगाव येथील रहिवाशी तयारीनिशी ओढ्याजवळील झाडाजवळ पोहोचले. लोकांनी आरडाओरड केला. मात्र वाघीण हलायला तयार नव्हती. अखेर सर्व प्रयत्न विफल झाल्यानंतर गावक-यांनी सोबत आणलेले फटाके फोडण्यास सुरुवात केली. फटाक्यांचा आवाज ऐकताच वाघिणीने घटनास्थळावरून पळ काढला.

ओढ्याजवळच वाघिणीचा बछड्यांसह वावर
वाघीण तिथे का होती? याचे मुख्य कारण म्हणजे वाघिणीने ओढ्याजवळच एका गायीची शिकार केली होती आणि वाघीण एकटी नाही तर ती तिच्या बछड्यासह होती. जेव्हा विशाल घटनास्थळावर आला, तेव्हा त्या वाघिणीचे बछडे शिकार खात होते. बछड्यांना जेव्हा धोका वाटतो तेव्हा वाघीण आक्रमक होते व डरकाळी फोडते. त्यामुळे वाघिणीने डरकाळी फोडताच विशालने तिथून पळाला व  तो शेजारी असलेल्या झाडावर जीव वाचवण्यासाठी चढला. गावकरी पोहोचल्यानंतर फटाक्यांच्या आवाजानंतर वाघीण घटनास्थळावरून निघून गेली. त्यानंतर घटनास्थळावरील लोकांनी ओढ्याजवळ पाहणी केली. तेव्हा त्यांना ओढ्याच्याच शेजारी एक अर्धवट खाल्लेली गायीची शिकार आढळून आली. तसेच बछड्यांचेही ठसे आढळून आले. त्यावरून ज्यावेळी विशाल त्या रस्त्यावरून जात होता, त्यावेळी वाघिणीचे बछडे शिकार खात होते व वाघिणीला धोका वाटल्याने तिने डरकाळी फोडली, असा अंदाज बांधला जात आहे. 

गेल्या दोन तीन दिवसांपासून वाघांचे ठस्से
हा प्रकार घडल्यानंतर घटनास्थळावरील लोकांनी तातडीने वनविभागाच्या कर्माचा-यांना याबाबत माहिती दिली. सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे पायांचे ठसे लवकर ओळखता येतात. गेल्या तीन चार दिवसांपासून या परिसरात वाघांच्या पायाचे ठसे आढळून आले होते. मात्र वाघ कुणालाही न दिसल्याने याकडे दुर्लक्ष झाले होते. दरम्यान याच भागात बछड्यांचेही ठसे दिसल्याने या भागात वाघीण तिच्या बछड्यासह असल्याची माहिती मिळत आहे.

वाघाने शिकार केल्यानंतर वाघ घटनास्थळावरून जो पर्यंत शिकार संपत नाही, तो पर्यंत तो शिकारीपासून हटत नाही. घटनास्थळावर गायीची अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत शिकार आढळून आली. त्यामुळे जोपर्यंत शिकार संपत नाही तोपर्यंत वाघिणीचे त्या भागात तिच्या बछड्यांसह वास्तव्य राहणार आहे. त्यामुळे परिसरातील लोकांनी आणखी 3-4 दिवस खबरदारी घ्यावी असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे. 

हे देखील वाचा:

ऍक्सिडेंटल नगराध्यक्ष… संजय देरकर…

बँकेसमोरून दुचाकी चोरणा-याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अखेर मंदिरासमोरील ‘ते’ अतिक्रमण काढले

Comments are closed.