भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील सालेभट्टी येथे वाघ शिकारीसाठी थेट शेत शिवारातच घुसला. वाघाने पाठलाग करत एका गायीची शिकार केली. बुधवारी दुपारी ही घटना घडली. दरम्यान गाय घरी परत न आल्याने पशू पालकाने शोधाशोध केली असता आज सकाळी गाय मृत अवस्थेत आढळून आली. वाघ शिकारीसाठी थेट शेत शिवारातच शिरल्याने परिसरातील शेतकरी व शेतमजुरांमध्ये दहशत पसरली आहे.
सविस्तर वृत्त असे की बुधवारी दिनांक 23 फेब्रुवारी रोजी गुराखी गावातील काही गायींना चरवाईसाठी सालेभट्टी शिवारात गेला होता. दरम्यान दुपारी 4.30 वाजताच्या दरम्यान शिवारात वाघाची एन्ट्री झाली. वाघाच्या डरकाळीने कळपातील काही गायी गावाकडे पळत सुटल्या तर काही गायी जंगलाच्या दिशेने पळाल्या. ज्यांच्या गायी जंगलात गेल्या त्यांचे मालक गायींना शोधण्यासाठी सालेभट्टी शिवारात गेले. मात्र तिथे त्यांना गाय आढळून आली नाही. संध्याकाळी बेपत्ता असलेले सर्व जनावरे घरी परत आले, फक्त लोनसावळे यांची गाय मात्र घरी परत आली नाही.
सकाळी 6 वाजताच्या सुमारास लोनसावळे यांचे जावई दत्तू झिबल कोरझरे हे काही जणांना सोबत घेऊन सालेभट्टीच्या जंगलात गेले. तिथे त्यांना त्यांच्या गायीची शिकार झाल्याचे आढळून आले. त्यांनी याची माहिती वनविभागाच्या कर्मचा-यांना दिली. घटनेचा पंचनामा केला असता सदर हल्ला वाघाने केल्याचे स्पष्ट झाले. वाघाच्या हल्ल्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.