गोडगाव शिवारात वाघाचा गायीवर हल्ला, गाय ठार

आज दुपारी उघडकीस आली घटना, शेतकरी, शेतमजूर दहशतीत

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी दुपारी गोडगाव शिवारात वाघाने गायीवर हल्ला करून गायीला ठार केले.  आज शनिवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. गेल्या काही दिवसांपासून गोडगाव शिवारात वाघाचा मुक्त संचार असून वाघाच्या सततच्या हल्यामुळे परिसरातील शेतकरी शेतमजूर दहशतीत आले आहे.

गोडगाव येथील रहिवाशी असलेले अनिल शंकर दोरखंडे यांची इजासन शिवारात शेती आहे. शुक्रवारी दुपारी गुराखी त्यांचे जनावरे घेऊन गोडगाव शिवारात चरण्यासाठी घेऊन गेला होता. संध्याकाळी गुराखी जनावरे  घेऊन परत आला. मात्र त्यात दोरखंडे यांची 1 गाय बेपत्ता आढळली. मात्र अंधार झाल्याने त्यांनी शोध घेतला नाही.

सकाळी शेतमालक गुराखी व गावातील काही लोकांना सोबत घेऊन जंगलाच्या दिशेने शोध घेण्यास गेले. दरम्यान 1 ते दिड वाजताच्या सुमारास त्यांना त्यांची गाय मृत अवस्थेत आढळली. तिची शिकार झालेली आढळली. या परिसररात वाघाची दहशत असल्याने व गायीचा मृतदेह बघता हल्ला वाघाने केल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी लगेच वनविभागाला याबाबत माहिती दिली. वनविभागाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

परिसरातील शेतकरी शेतमजूर दहशतीत
कायर, गोडगाव, इजासन, नवरगाव, सुकणेगाव, रासा इत्यादी परिसरात वाघाचा मुक्त संचार आहे. 15 दिवसांआधी जवळच असलेल्या नवरगाव येथे एका वाघाने गायीची शिकार केली होती. वाघाच्या सततच्या हल्यामुळे परिसरात एकच दहशत पसरली आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. सध्या शेतामध्ये सोयाबिनची कापणी आणि कापसाची वेचणी सुरू आहे. मात्र परिसरात वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी शेतमजूर कामाला शेतात जाण्यास धजावत आहे.

गोडगाव येथील नागरीकांनी दोन ते तीन महिन्याच्या आधी वनविभागाला निवेदन देऊन वाघाला जेरबंद करण्याची मागणी केली होती. मात्र त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात आली. या परिसरात सातत्याने वाघाने जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना समोर येत आहे. या क्षेत्रा लगतच असलेल्या विरकुंड येथे चार दिवसाआधी एक शेतकरी व वाघ समोरासमोर आले होते. मात्र सुदैवाने यात त्या शेतक-याचा जीव वाचला होता. या परिसरात वाघाचा दोन बछड्यांसह मुक्त संचार असल्याने परिसरात दहशत पसरली आहे. 

हे देखील वाचा:

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

मतदानाला 12 गेले… 12 च परत आले… पण मत मिळाले 11: वारे नगरपालिकेचे भाग 5

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.