टिळक चौक ते दीपक चौपाटी व गांधी चौक ते काठेड ऑईल मिल पर्यंत होणार सिमेंट रस्ता

दहा कोटींच्या निधीतून शहरातील दोन मुख्य रस्त्यांचा होणार कायापालट

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात सर्वात जास्त रहदारी असलेल्या टिळक चौक ते दीपक चौपाटी व गांधी चौक ते काठेड ऑईल मिल या दोन मुख्य रस्त्यांचा लवकरच कायापालट होणार आहे. या दोन्ही मार्गावर सिमेंट काँक्रिट रोड, पेवर ब्लॉक व भूमिगत ड्रेनेजसाठी नगर विकास विभागाने 10 कोटी रुपये मंजूर केले आहे. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नातून हा निधी प्राप्त झाला आहे.

येथील टिळक चौक पासून आंबेडकर चौक, टागोर चौक, सरोदय चौक ते दीपक टॉकीज चौपाटी पर्यंत तब्बल 1 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सर्वात जास्त रहदारी असलेल्या या मार्गावर वाहनचालकांना खड्डयात रस्ता शोधून वाहन चालवावे लागतात. तसेच गांधी चौक, तुटी कमान ते काठेड ऑईल मिल पर्यंतचा रस्ता पूर्णपणे खराब अवस्थेत आहे. या दोन्ही मार्गावर वाहनाची वर्दळ व रस्त्याच्या धुळीमुळे व्यावसायिक त्रस्त झाले आहे.

वणी शहरातील वणी नगर परिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दीपक चौपाटी पर्यंत सिमेंट रस्ता, लादीकरण व भूमिगत नाली गटार बांधकामासाठी 700 लक्ष रुपये देण्यात आले आहे. तर गांधी चौक, तुटी कमान ते काठेड ऑईल मिल पर्यंत सिमेंट रस्ता, लादीकरण व भूमिगत नाली गटार बांधकामासाठी 300 लक्ष रुपये नगर विकास विभागाने मंजूर केले आहे.

सदर दोन्ही रस्त्याबाबत लवकरच ऑनलाईन निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असून 2023 अखेर पर्यंत दोन्ही रस्त्यांचा काम पूर्ण होणार असल्याची माहिती आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी वणी बहुगुणीशी बोलताना दिली.

हे देखील वाचा: 

Breaking News: वाघाचा वेकोलि कर्मचा-यावर हल्ला, कामगार जखमी

अल्पवयीन मुलीशी बळजबरी लग्न, मुलीला गर्भवती करून आरोपी पसार

 

Comments are closed.