अपघात : ट्रक रस्ता सोडून घुसला चक्क टोल नाक्यात….

सातत्याने ट्रकची धडक ठरतायेत चिंतेची बाब, आठवड्यात दोन अपघात

विवेक तोटेवार, वणी: कोळसा वाहतूक करणारा एक भरधाव ट्रक अनियंत्रित होऊन चक्क टोलनाक्यात घुसला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र टोलनाक्याचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी ट्रक चालक बबलू उर्फ प्रफुल्ल विठ्ठल राजगडकर याला ताब्यात घेण्यात आले. गेल्या आठवड्यातच भरधाव ट्रकने धडक देण्याच्या दोन घटना घडल्या होत्या. यात एकाचा मृत्यू झाला होता तर एक सुदैवाने बचावला होता. सातत्याने ट्रकच्या धडकेमुळे होणारे अपघात ही चिंतेची बाब ठरत आहे.

प्राप्त माहितीनुसार, रविवारी दिनांक 3 मार्च रोजी ट्रकचालक बबलू हा कोळसा भरलेला ट्रक (MH34 BZ2072) घेऊन वणीच्या दिशेने येत होता. दरम्यान 7 वाजताच्या सुमारास वरोरा रोडवरील रेल्वे गेटच्या आधी असलेल्या टोक गेटच्या आधी ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व ट्रक थेट टोलनाक्यात घुसला. दरम्यान ट्रक येतानाची चाहूल लागल्याने टोलनाक्याच्या कॅबिनमध्ये बसलेला कर्मचारी तात्काळ बाहेर आला व त्याचा जीव वाचला.

मदमस्त ट्रकचालकांमुळे होतायेत अपघात
या घटनेत टोलनाक्यावर सेक्युरिटी गार्ड आणि इतर कर्मचारी नव्हते. त्यामुळे अनर्थ घडला नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून काही मदमस्त ट्रकचालकांमुळे सातत्याने अपघात होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यातच ट्रकने दुचाकीला धडक दिल्याच्या दोन घटना घडल्या होत्या. याकडे वाहतूक विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

हा प्रकरणी ट्रकचालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती घटनास्थळावरील काही लोकांनी दिली. या प्रकरणी ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले असून प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.