संपूर्ण उमरी गाव सिल, गावात तीन दिवस लॉकडाऊन…

कसे आले मुंबईतून वणीत? कशी उघडकीस आली ही घटना?

0

जितेंद्र कोठारी, वणी: उमरी येथे कोरोनाचे दोन संशयीत आढळल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. गावाने खबरदारी म्हणून संपूर्ण गावाची बॉर्डर सिल केली असून गावात तीन दिवसांचे (रिपोर्ट येत पर्यंत) लॉकडाऊऩ जाहीर केले आहे. त्यामुळे गावातील संपूर्ण व्यवहार बंद असून गावाच्या बाहेर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. सध्या दोघांना यवतमाळ येथे आयसोलेशनमध्ये तर दोन व्यक्तींना परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये कॉरन्टाईन करण्यात आले आहे. या प्रकरणी सध्या विविध तर्क वितर्क लावले जात आहे तसेच अफवांनाही ऊत आला आहे. हे कुटुंब मुंबईहून गावी कसे पोहोचले? या व्यक्तींना लक्षणं आहे हे कसे समोर आले? याबाबतचा हा सविस्तर वृत्तांत…

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरी (पेटूर) येथील एक तरुणी गेल्या एका वर्षांपासून मानेगाव (कल्याण) येथे कामा निमित्त वास्तव्यास होती. काही महिन्यानंतर तिने आपली मोठी बहीण आणि वडिलांनाही कल्याण येथे कामासाठी बोलाविले. त्यामुळे तिचे वडील व मोठी बहिण तिच्या बाळासह कल्याणला बहिणीकडे गेले. तिथे ते तिघेही नोकरी करायचे. कोरोनामुळे लॉकडाउन लागले. त्यांचे तिथले काम बंद झाले. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले. काम बंद झाल्याने त्यांनी परत आपल्या गावी जाण्याचे ठरविले.

पायदळ आणि मिळेल त्या साधनाने प्रवास…
लॉकडाऊऩमुळे सर्व प्रकारची वाहतूक बंद असल्यामुळे कुटुंबातील 3 व्यक्ती व 3 वर्षाचे बाळ घेऊन ते पायीच कल्याणहून निघाले. त्यांनी कल्याण ते गोवा नाक्या पर्यंत पायीच प्रवास केला. गोवा नाक्यावर त्यांना एक टेम्पो मिळाला. त्यांनी गोवा नाका ते मालेगाव पर्यंत एका टेम्पोत प्रवास केला. मात्र मालेगावहून त्यांना पुढच्या प्रवासासाठी साधन मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी मालेगाव ते धुळे पर्यंत पुन्हा पायदळ प्रवास केला.

धुळे येथे त्यांना नागपूर जाणारी एक खासगी ट्रॅव्हल मिळाली. त्यांनी नागपूरपर्यंत ट्रॅव्हल्सने प्रवास केला. नागपूरवरून ते चंद्रपूरला एका बसने पोहचले. त्यानंतर त्यांच्यापुढे वणीला कसे पोहोचायचे ही समस्या होती. तिथे त्यांना एक वणीच्या दिशेने जाणारा ट्रक मिळाला. त्यांनी त्या ट्रकच्या केबिनमध्ये बसून चंद्रपूरहूून वणी गाठले. वणी येथे वरोरा बायपासजवळ ते उतरले. तिथून त्या चौघांनीही उमरीपर्यंतचा 10-12 किलोमीटरचा प्रवास पायदळ केला. उमरी गावाच्या वेशीवर पोहोचताच त्यांनी गावात याबाबत सूचना दिली.

मुंबईहुन कुटुंब गावात आल्याची माहिती मिळताच ग्राम पंचायतचे माजी उप सरपंच राजेश सिडाम यांनी आरोग्य विभागाला याबाबत माहिती दिली. त्यावरून आरोग्य विभागाने कुटुंबाला परसोडा येथे कोविड-19 तपासणी केंद्रात नेऊन आरोग्य तपासणी केली. त्यानंतर कुटुंबातील 3 व्यक्ती व एक लहान बाळ यांना उमरी गावाबाहेर असलेल्या जि. प. शाळेमध्ये 19 मे रोजी क्वॉरन्टीन करण्यात आले.

गावातर्फे योग्य ती खबरदारी…
शाळेत क्वारन्टीन झालेल्या कुटुंबाला एक व्यक्ती घरून जेवणाचा डब्बा आणून देत होता. परंतु कवारन्टीन झालेल्या लोकांच्या संपर्कात येत असल्यामुळे गावातील नागरिकांची ओरड सुरू झाली. त्यामुळे क्वारन्टाईन झालेल्या कुटुंबाला शाळेतच जेवणाच्या साहित्याची व्यवस्था करून देण्याचे ठरले. त्यामुळे शाळेतच त्यांना तांदूळ, कणिक, तेल, डाळ, मसाला, भाजी ई. साहित्य पुरविण्यात आले.

माजी उपसरपंच राजेश सिडाम हे दुस-या दिवशी पाहणी करण्यासाठी गेले. तिथे त्यांनी दुरूनच त्या कुटुंबाबाबत विचारणा केली. त्यात त्यांना एक व्यक्ती नसल्याचे आढळले. त्यांनी याबाबत विचारणा केली असता ती व्यक्ती बरे वाटत नसल्याने झोपून असल्याचे सांगितले. त्यांनी आजारी असलेल्या व्यक्तीला विचारणा केली असता त्या व्यक्तीने ताप, खोकला व घश्यात दुखत असल्याचे सांगितले. यावरून सिडाम यांनी लगेच प्राथ. आरोग्य केंद्र कायर येथील डॉ. अमित शेंडे यांना माहिती दिली. त्यावरून आरोग्य कर्मचाऱ्यांनी या कुटुंबाला 108 रुग्णवाहिकेने परसोडा येथील कोविड केअर सेंटर येथे नेले.

दोघांना कोरोनासदृष्य लक्षणे
परसोडा येथे तपासणी केली असता. त्या चौघापैकी दोघांमध्ये कोरोना सदृश लक्षणं निदर्शनास आल्यामुळे त्यांना तात्काळ यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तर उर्वरित दोन व्यक्तींना परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये कॉरेन्टाईन करण्यात आले आहे. तर एक दिवस डबा दिलेल्या व्यक्तीला होम कॉरन्टाईन करण्यात आले आहे.

संपूर्ण गाव सिल, गावात तीन दिवस लॉकडाऊन…
गावातीलच दोन व्यक्ती आईसोलॅशन मध्ये असल्यामुळे खबरदारी म्हणून गावक-यांनी स्वयंस्फुुतीने गावाला तीन दिवससाठी सिल करून संपूर्ण गावात टाळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर केली. गावात कुणीही येऊ नये म्हणून गावाच्या वेशीवर काटे टाकून गाव सिल करण्यात आले. तर स्थानिक पातळीवर तीन दिवसांचे लॉकडाऊन करून या तीन दिवस गावातील संपूर्ण व्यवहार बंद करण्यात आले आहे. गावातील कोणत्याही एका कुटुंबाने दुस-या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये असे आवाहन केले आहे.

उमरी गावातीळ 40 ते 50 व्यक्ती वणी येथील कापड, किराणा, मेडिकल, हार्डवेअर व इतर दुकानात नोकरी करीत असून ते दररोज उमरी ते वणी अप डाउन करतात. परंतु 3 दिवस गावात लॉकडाउन केल्यामुळे त्यांनाही गावातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या तीन दिवसात गावातील कोणीही बाहेर जाणार नाही, किंवा बाहेरचा व्यक्ती गावात प्रवेश करणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.

उमरी गावातील परिस्थितीवर आरोग्य विभाग, तहसील व पंचायत समिती प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाचे पूर्ण लक्ष असून आईसोलॅशनमध्ये असलेल्या रुग्णांची रिपोर्ट मिळाल्यानंतर पुढील कारवाई ठरविण्यात येणार आहे.

प्रशासनातर्फे संपर्क साधण्याचे आवाहन…
परिसरात संशयीत आढळल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. बाहेरगावाहून जर कुणी व्यक्ती गावात अथवा शहरात प्रवेश करत असल्यास त्याची माहिती देण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. त्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून 07239225062 या हेल्पलाईनवर नागरिकांना संपर्क साधता येणार आहे. व्यतिरिक्त ग्रामीण भागात सरपंच व पोलीस पाटील तर शहरी भागात नगरसेवकांना याबाबत माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणा-यांचे नाव हे गुप्त ठेवले जाणार असल्याने कुणी व्यक्ती जर बाहेरून गावात अथवा शहरात आले असल्यास याची माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.