ज्योतिबा पोटे, मारेगाव: बहिणीच्या लग्नासाठी आलेल्या तरुणाची हत्या करून वनोजादेवीजवळ गोरज फाट्यावर मृतदेह फेकण्यात आला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा अवघ्या 24 तासांच्या आत पोलिसांनी छडा लावला असून या प्रकरणी एका संशयीताला पोलिसांनी अटक केली आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती मिळतये.
शुभम अनिल झाडे (19) हा वनोजा येथील रहिवाशी होता. तो औरंगाबाद इथे खासगी कंपनीत नोकरी करत होता. तीन दिवसांआधी त्याच्या मावस बहिणीचे लग्न असल्याने तो लग्नासाठी आधीच वनोजा इथं त्याच्या गावी आला होता. लग्नकार्य संपल्यानंतर तो बेपत्ता होता. सुरूवातीला तो मित्रासोबत असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांना वाटले. मात्र अखेर
गुरुवारी सकाळी वनोजापासून 2 किलोमीटर अंतरावर गोरजफाटा इथं त्याचा मृतदेह आढळून आला.
असा लावला प्ररकरणाचा छडा?
पोलिसांना हा प्रेम प्रकरणातून झालेला प्रकार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. त्यावरून त्यांनी चक्र फिरवले व मोबाईल लोकेशनच्या आधारे माहिती काढली असता. मुलीच्या वडिलांचे लोकेशन सदर ठिकाणी आढळून आले. त्यावरून पोलिसांनी आजनसरा येथून संशयीत आरोपीला अटक केली.
शुभमचे गावातीलचे एका मुलीसोबत प्रेम संबंध होते. घटनेच्या दिवशी रात्री बाहेर सर्व झोपी गेले असता मुलीने मुलाला भेटण्यासाठी घरी बोलावले होते. त्यावरून मुलगा घरी भेटायला गेला. दरम्यान मुलीच्या वडिलांना ही बाब लक्षात आली. त्यावरून मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह गोरज फाट्यावर टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
हत्येनंतर कुणाला संशय येऊ नये म्हणून मुलीच्या वडिलांनी अजनसरा येथे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला. मात्र पोलिसांनी मोबाईल लोकेशनचा आधार घेत आरोपीला अजनसरा येथून अटक केली. या आधीही शुभम आणि तरुणी भेटले असताना त्यांना आरोपीने पकडले होते. त्यावेळी शुभमला धमकावून सोडून दिल्याची माहिती मिळतये. या हत्या प्रकरणात आरोपी एकच आहे की ही कुटुंबातील व्यक्तीने सामुहिक रित्या केली याचा तपास पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर यांच्या मार्गदर्शनात केला जात आहे.