…आणि हत्याकांडात आले तत्कालीन नगराध्यक्षांचे नाव…. वारे नगरपालिकेचे भाग 3
1992 मध्ये वणीतील नगराध्यक्षाबाबत एक अशी घटना घडली की त्याने केवळ शहर, जिल्हा नाही तर संपूर्ण राज्य हादरून गेले होते. भररस्त्यावर एका व्यावसायिकांच्या हत्येने शहरात एकच खळबळ उडाली होती.
जब्बार चीनी, वणी: ‘वारे नगरपालिकेचे’ या मालिकेद्वारा आम्ही नगरपालिकेच्या राजकारणातील विविध किस्से, रंजक राजकीय घडामोडी, डावपेच आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. आजच्या तिस-या भागात आपण नगरपालिकेच्या इतिहासातील एक काळा अध्याय बघणार आहोत. वणीतील नगराध्यक्षाबाबत एक अशी घटना घडली की त्याने केवळ शहर, जिल्हा नाही तर संपूर्ण राज्य हादरून गेले होते. ही कहाणी आहे एका नगराध्यक्षाची. एका नगराध्यक्षावर सुपारी देऊन हत्या केल्याचा आरोप झाला. 1991 ची निवडणूक केवळ याच कारणामुळे नाही तर इतर कारणामुळेही महत्त्वाची ठरते. ते आपण पुढे बघणारच आहोत.
वारे नगर पालिकेचे भाग 3
शहरातील सुप्रसिद्ध कोळसा व्यापारी म्हणून स्व. मदन अण्णा पुनियाला यांची ओळख होती. ते व्यावसायिक कामासाठी वणीतून रोज सकाळी माजरी येथे जायचे. 27 मे 1992 ची सकाळ. वेळ सकाळी 7.30 वाजताची असावी. नेहमी प्रमाणे ते वणी-वरोरा रोडवरील रेल्वे क्रॉसिंगजवळ पोहोचले. त्याचवेळी तिथे काही लोक त्यांची वाट बघत होते. जशी त्यांची गाडी तिथल्या लोकांना येताना दिसली. त्यांनी त्वरित रेल्वे फाटक बंद केले. या प्रकाराने ते गोंधळून गेले. गेट बंद झाल्याने जशी रेल्वे क्रॉसिंगजवळ गाडी थांबली. त्याच्या डाव्या बाजूने एक कार आली. ड्रायव्हरच्या शेजारी मदन अण्णा बसलेले होते. दुस-या कार मधून आलेल्या हल्लेखोरांनी मदन अण्णा यांच्यावर पिस्तूल रोखली आणि फायरिंग केली. लगेच कार रिव्हर्स घेऊन हल्लेखोर तिथून निघून गेले. या फायरिंगमध्ये मदन अण्णा त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. त्यामागचे कारण ही तसेच होते. हत्या जरी एका व्यावसायिकाची असली तरी त्याचे तार मात्र एका राजकीय नेत्याशी जुळलेले होते.
हल्लेखोरांच्या गाडीच्या मागे ‘श्री’ या अक्षराचे स्टिकर होते. हा धागा पकडून पोलिसांनी तपास केला आणि त्यात संशयीत म्हणून तत्कालिन नगराध्यक्ष शामराव ठाकरे यांचे नाव आले. एका नगराध्यक्षाचे नाव आल्याने खळबळ माजणे सहाजिक होते. तशी दिवसभर संशयीत म्हणून त्यांच्याच नावाची शहरात चर्चा होती. आणि त्याला कारण ही तसेच होते. ते जाणून घेण्याआधी आपल्याला या हत्येच्या एक ते दीड महिने आधी जावे लागेल. तसेच तत्कालिन नगराध्यक्ष शामराव ठाकरे कोण होते हे देखील थोडक्यात जाणून घ्यावे लागेल.
शामराव ठाकरे हे शहरातील एक कोळसा व्यावसायिक होते. एकता नगर येथे ते कुटुंबासह राहायचे. अल्पावधीतच त्यांनी एक यशस्वी कोळसा व्यावसायिक म्हणून शहरात आपली ओळख निर्माण केली. कोळसा व्यवसायात यशस्वी आणि मोठा पल्ला गाठणारे ते पहिलेच मराठी व्यावसायिक होते. त्यावेळी मदन अण्णा पुनियाला यांचे कोळसा व्यवसायात मोठे नाव होते. नवश्रीमंत झालेल्या व्यक्तीला जसे राजकारणाचे वेध लागते तसेच शामराव ठाकरे यांनाही राजकारणात उतरण्याची इच्छा झाली. व्यवसायात प्रगती झाल्यानंतर ते एकता नगर येथून रवि नगर येथे एका नवीन बंगल्यात स्थायिक झाले. तेव्हा रवि नगर उदयास यायचे होते. टिळक नगरचे शेवटचे टोक होते ते. त्या ठिकाणी घर बनायला नुकतिच सुरुवात झाल्याने हा परिसर तसा ओसाडच होता.
नोव्हेंबर 1991 मध्ये नगर पालिकेची निवडणूक होणार होती. शामराव ठाकरे यांनी निवडणुकीत नसीब आजमवण्याचे ठरवले. त्या वेळी ते राहत असलेला वार्ड क्रमांक 1 हा वार्ड एससी महिला राखीव असल्याने त्यांनी निवडणुकीसाठी त्यांचा एकता नगर, गुरुनगर येथील जुना वार्ड म्हणजेच वार्ड क्रमांक 4 हा उभा राहण्यासाठी निवडला. ते अपक्ष म्हणून उभे राहिले. निवडणुकीत त्यांनी धुवाधार प्रचार केला व ते बहुमताने निवडून ही आले. मात्र त्यांचा हा प्रवास केवळ इथेच थांबला नाही तर आश्चर्यकारकरित्या ते नगराध्यक्षही बनले.
हत्याकांच्या एक ते दीड महिना आधी म्हणजे एप्रिल 1992 रोजी एक दिवस शामराव ठाकरे हे रविनगर येथील त्यांच्या घरून सकाळी बाहेर निघण्यासाठी कारमध्ये बसले. घरासमोरच अचानक त्यांच्यावर पिस्तुलने फायरिंग झाली. वा-यासारखी ही घटना संपूर्ण वणी शहरात पसरली. नगराध्यक्षांवर फायरिंग झाल्याच्या बातमीने दुस-या दिवशी पेपरचे कॉलम भरलेले होते. मात्र सुदैवाने या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. त्यांना किरकोळ इजा झाली. काही दिवसात त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली. सुटी झाल्यानंतर वणीतून त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली.
या हल्ल्यामध्ये शहरातीलच एका कोळसा व्यापा-यांचे नाव संशयीत म्हणून पुढे आले. कोळसा व्यावसायातील स्पर्धेतून त्यांच्यावर हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी संशयीतांनर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र एवढ्यावर हे प्रकरण थांबणार नव्हते. शामराव ठाकरे यांच्या मनात सूड भावना पेटली होती. या प्रतिशोधातून त्यांनी वेळ साधून सुपारी किलर यांच्या मदतीने स्व. मदन अण्णा पुनियाला यांची वरोरा रोडवरील रेल्वे क्रॉसिंगजवळ सुपारी देऊन हत्या केली, असा आरोप शामराव ठाकरे यांच्यावर झाला. पुढे या प्रकरणी गुन्हा सिद्धही झाला. काहींना यात शिक्षाही झाली.
कोळसा व्यावासायिकाची पहिल्यांदाच वणीच्या राजकारणात थेट एन्ट्री
1991 च्या निवडणुकीतून शामराव ठाकरे यांच्या रुपाने पहिल्यांदाच कोळसा व्यावसायिकांची थेट एन्ट्री झाली. त्याकाळी स्व. मदन अण्णा पुनियाला यांना कोळसा व्यावसायातील ‘डॉन’ मानले जायचे. ते तत्कालिन खासदार उत्तमराव पाटील यांच्या अत्यंत निकटवर्तीय होते. त्यांचा तेलुगू भाषीक पट्यामध्ये चांगला प्रभाव होता व त्यांना मानणारा मोठा वर्ग होता. त्याची राजकारण्यांना मदत व्हायची, मात्र ते देखील थेट राजकारण उतरले नव्हते. शामराव ठाकरे हे थेट राजकारणात उतरणारे पहिले कोळसा व्यावसायिक होते. त्यानंतर अनेक कोळसा व्यावसायिक शहरातील राजकारणात उतरले. त्यातील स्व. सतीशबाबू तोटावार हे पुढे नगराध्यक्षही बनले.
नगराध्यक्षपदासाठी घोडेबाजाराला सुरुवात !
1991 ची निवडणूक ही विशेष यासाठी महत्त्वाची ठरते कारण कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेली व्यक्ती अचानक अपक्ष नगरसेवक होते आणि लगेच अनेक धुरंधर राजकारण्यांना धोबीपछाड देत नगराध्यक्ष बनते. हे सर्वांसाठीच आश्चर्यकारक होते. शहरातील राजकारण जवळून बघितलेले ज्येष्ठ राजकीय नेते मंडळींचा असा दावा आहे की या निवडणुकीपासूनच घोडेबाजाराला सुरूवात झाली. पुढे काही निवडणुकीमध्येही अशी कुजबुज चालली. मात्र याची सुरूवात इथूनच झाल्याचे बोलले जाते.
उपाध्यक्षांनी सांभाळला सर्वाधिक काळ नगराध्यक्षपदाचा प्रभार
तत्कालिन नगराध्यक्ष शामराव ठाकरे यांच्यावर हत्येचा आरोप झाल्यानंतर ते फरार होते. नगरपालिकेच्या सलग तीन सभेला ते कोणतीही सूचना न टाकता गैरहजर राहिल्याने पुढे त्यांचे पद रद्द झाले. त्यामुळे नगरपालिकेच्या नियमानुसार उपाध्यक्षांकडे नगराध्यक्षाचा प्रभार आला. पी. के. टोंगे हे तेव्हा उपाध्यक्ष होते. त्यांच्याकडे नगराध्यक्ष पदाचा प्रभार आला. त्यांनी नगरपालिकेच्या इतिहासात सर्वात जास्त काळ नगराध्यक्ष पदाचा ‘प्रभार’ सांभाळला. सुमारे 2 वर्ष त्यांनी हा प्रभार सांभाळला. अद्यापही हा रेकॉर्ड त्यांच्याच नावे आहे. त्यांनीच त्या काळातील अर्थसंकल्प मांडला. उपाध्यक्ष राहून अर्थसंकल्प मांडणारे ते पहिले उपाध्यक्ष सुद्धा ठरले.
नवश्रीमंतांना खुणावू लागले राजकारण
1991 चा काळ हा यासाठी महत्त्वाचा ठरतो कारण भारताने 1990 साली जागतिकीकरणाला सुरुवात केली. व्यापार, विदेशी थेट गुंतवणूक, भांडवल प्रवाह, तंत्रज्ञान इत्यादींसाठी राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थांसाठी खुले केले. त्याचा परिणाम असा झाला की लोकांजवळ पैसा खेळू लागला. याच काळात शहरात अनेक नवश्रीमंत तयार झाले. हाती पैसा आल्यानंतर त्यांना राजकारण खुणावू लागले. या काळातच अनेक नवश्रीमंत लोक राजकारणात येण्यास सुरुवात झाली.
रेल्वे क्रॉसिंग जवळील हत्याकांड जरी राजकारणातून झाले नसले त्याची तार एका लोकप्रतिनिधीशी जुळल्याने नगर पालिकेसाठी हा एक काळा अध्याय ठरला. त्या आधी किंवा त्यानंतरही असे प्रकार कधीही निवडणुकीत घडले नाही. मात्र या प्रकरणाचा राजकीय परिणाम होणार नाही असे होणे अशक्य आहे. या घटनेमुळे कसे राजकारण धवळून निघाले? त्याचा शहरातील राजकारणावर काय परिणाम झाला हे आपण पुढल्या भागात बघणार आहोत.
क्रमश:
(नगरपालिका निवडणुकीचे विविध किस्से, रंजक राजकीय घडामोडी आणि डावपेच पुढील भागात. त्यामुळे वारे नगर पालिकेचे ही सिरीज वाचण्यास विसरू नका…)
वणी बहुगुणीच्या सर्व अपडेट साठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज तसेच गृप जॉईन करा…
पेज लिंक – https://www.facebook.com/wanibahuguni/
गृप लिंक – https://www.facebook.com/groups/241871233000964/
हे देखील वाचा:
Comments are closed.