रेशन दुकान प्रकरण: इजासन येथील ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
वेळोवेळी तक्रार करूनही दखल न घेतल्याने उपसले उपोषणाचे हत्यार
जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील इजासन (गोडगाव) येथे स्वस्त धान्य दुकानाबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रार केली. मात्र तक्रार केल्यानंतरही इथली वितरण व्यवस्था सुरळीत झाली नाही. त्यामुळे अखेर इजासनच्या रहिवाशांनी 17 जून पासून उपोषणाचा इशारा दिला आहे. त्याबाबत त्यांनी तहसिलदारांना निवेदन दिले आहे.
इजासन (गोडगाव) येथील रेशनच्या दुकानाबाबत ग्रामस्थांच्या विविध तक्रारी होत्या. शासकीय नियमानुसार धान्याचे वितरण न होणे, धान्य वाटप कमी प्रमाणात करणे, शासकीय दरापेक्षा अधिक दर आकारणे. गेल्या महिन्यात न सोडवलेले धान्य पुढील महिन्यात न देणे. धान्य घेतल्यावर पावती देत नाही. दुकानात धान्य भाव फलक लावल्या जात नाही. याबाबत लोकांनी विचारणा केल्यास अरेरावीची भाषा वापरली जाणे इत्यादी समस्येमुळे ग्रामस्थ त्रस्त होते. याबाबत दि. 22 मे 2020 ला तक्रार करण्यात आली होती.
दि. 23 मे 2020 ला त्याप्रकरणाची चौकशी पार पडली. त्यानंतर दि. 3 जून 2020 ला पून्हा निवेदन तहसीलदार यांचेकडे देण्यात आले. मात्र त्यानंतर ही दुकानावर कारवाई न झाल्याने इजासन येथील रहिवाशी संतप्त झाले आहेत. याबाबत त्यांनी पुन्हा निवेदन देऊन दुकानावर लवकरात लवकरकारवाई करावी अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
सध्या कोविडमुळे पाच-पाच लोक उपोषणाला बसणार असून जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यत उपोषण सुरु राहील असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे. निवेदनावर दक्षता समितीच्या सात सदस्यासह 75 नागरीकांची स्वाक्षरी आहे.