खापरी जवळील डम्पिंग ग्राउंडला गावक-यांचा विरोध कायम

सगणापूरच्या ग्रामसभेत डम्पिंग ग्राउंडचा ठराव मंजूर

सुरेश पाचभाई, बोटोणी: खापरी येथील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंडच्या मुद्यावरून गटग्रामपंचायत सगणापूरची ग्रामसभा गाजली. खापरी येथील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंडला खापरी ग्रामवासीयांनी विरोध आहे. सगणापूर येथील सर्वसाधारण ग्रामसभेत याबाबत ठराव मांडण्यात आला. ठरावाला बहुमताने मंजूरी देण्यात आली. मात्र खापरी वासियांनी खापरीजवळ डम्पिंग ग्राउंड होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. याविरोधात मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही खापरी वासीयांनी दिला आहे.

Podar School 2025

सविस्तर वृत्त असे की सगणापूर गट ग्रामपंचायत अंतर्गत खापरी गाव आहे. भूमापण क्र. 51 मध्ये खापरी गावाची सुमारे 4.4 हेक्टर आर जागा आहे. यातील 1 हे.आर. जागा मारेगाव नगर पंचायतीने घनकचरा व्यवस्थापनासाठी (डम्पिंग ग्राउंड) मागितली आहे. याबाबत तहसीलदार मारेगाव यांनी 27 जुलै 2021 रोजी नोटीस काढून याबाबत 15 दिवसांच्या आता आक्षेप मागवले होते. दुस-याच दिवशी खापरी येथील रहिवाशांनी याला आक्षेप नोंदवला. सदर जागा ही गावालगत असून त्यामुळे रोगराईची भीती निर्माण होऊ शकते. शिवाय ही जागा गावाला पूनर्वसनाअंतर्गत मिळाली असल्याने ही जागा डम्पिंग ग्राउंडसाठी देऊ नये, असा आक्षेप खापरीच्या ग्रामस्थांनी घेतला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

गुरूवारी दि. 9 सप्टेंबर रोजी गट ग्रामपंचायत कार्यालय सगणापूर येथे सर्वसाधारण ग्रामसभा घेण्यात आली. ही सभा चांगलीच वादळी ठरली. यात सगणापूरच्या अधिकाधिक लोकांनी डम्पिंग ग्राउंडला समर्थन दिले तर खापरी वासीयांनी विरोध दर्शवला. अखेर सभेत बहुमताने डम्पिंग ग्राउंडचा ठराव मान्य करण्यात आला. मात्र खापरी गाव छोटे असल्याने सभेत खापरीचे संख्याबळ कमी पडले. सगणापूर येथील रहिवाशांनी संख्याबळाच्या जोरावर हा प्रस्ताव मान्य करून घेतला. तसेच ग्रामसभा खापरी येथे लावण्याची मागणीही मान्य करण्यात आली नाही. त्यामुळे संख्याबळ कमी पडले असा आरोप करत गावक-यांनी खापरी येथे डम्पिंग ग्राउंड होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. 

ग्रामसभेला नायब तहसीलदार डी. जे. गौरकर, गटविकास अधिकारी संजय वानखेडे, विस्तार अधिकारी डी. पी. मूनेश्वर, नगर पंचायत अभियंता निखिल चव्हाण, ग्रामसेवक डी यु जाधव यांची प्रमुख उपस्थित होते. बुधवारी दिनांक 8 सप्टेंबर रोजी ही सगणापूर येथे महिला सभा झाली होती. त्या सभेत सगणापूर, रोहपट, आंबेधरी व खापरी येथील महिला सहभागी झाल्या होत्या. या सभेतही खापरी येथील महिलांनी जागेच्या ठरावाला विरोध केला होता. आता या प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा:

Comments are closed.