मतदारयादीत घोळ: प्रभाग रचनेत बदल, पण मतदारयादी जैसे थे
पत्रकार परिषदेतून मनसे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांचा घाणाघात
विवेक तोटेवार, वणी: वणी नगरपरिषदेच्या प्रभाग रचनेत बदल करण्यात आला असला, तरीही मतदार यादी अद्ययावत न केल्याने शहरातील मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकाराविरोधात मनसेने तीव्र आक्षेप नोंदवत नगरपालिकेवर षडयंत्राचा आरोप केला आहे.
रविवार, 12 ऑक्टोबर रोजी वणीतील शिवमुद्रा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मनसेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली असली तरी, प्रभाग रचना बदलल्यानंतर देखील मतदारयादी जुन्या रचनेनुसारच ठेवण्यात आली आहे. काही मतदार एका प्रभागात राहत असताना, त्यांची नावे दुसऱ्या प्रभागाच्या यादीत दिसत आहेत. या चुकीमुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून निवडणूक प्रक्रियेबाबत शंका उपस्थित होत आहे.”
बोढे पुढे म्हणाले, “नागरिकांना मतदारयादीच्या घोळात गुंतवून ठेवण्याचा हा प्रकार असून, पालिका प्रशासनाला मनमानी करण्याची मुभा देण्याचा हेतू यात दिसतो. हे एक नियोजित षडयंत्र आहे.”
प्रभाग रचनेनुसार नवीन मतदार यादी तयार करण्याची मागणी मनसेने केली असून, आक्षेप घेण्यासाठीची मुदत 13 ऑक्टोबरपर्यंत असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही मुदत वाढवावी आणि मतदारयादी योग्य प्रकारे अद्ययावत करावी, अशी मागणीही बोढे यांनी केली.

पत्रकार परिषदेला मनसेचे क्रिष्णा निमसटकर, शंकर पिंपळकर, सुरज पळसकर, प्रवीण बोतरा, सुजल तिवरी, अहमद रंगरेज, स्वयंम ठाकरे, नवीन पिंपळकर, श्रेयश वारारकर आणि योगेश ताडम यांच्यासह विविध माध्यमांतील पत्रकार उपस्थित होते.


Comments are closed.