वणी बहुगुणी इम्पॅक्ट: अखेर शिवनाळा वासियांना मिळाला डांबरी रस्ता

बातमी प्रकाशित होताच इस्टिमेटनुसार काम पूर्ण, निकृष्ट कामामुळे गावक-यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा

सुरेश पाचभाई, बोटोणी: शिवनाळा पासून यवतमाळ हायवेला जोडणा-या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. याबाबत ‘वणी बहुगुणी’ला वृत्त प्रकाशित होताच प्रशासन खडबडून जागे झाले व इस्टिमेटनुसार कामास सुरूवात झाली. नुकतेच या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून डांबरी रस्ता मिळाल्याबाबत शिवनाळावासियांनी समाधान व्यक्त केले आहे.

मारेगाव पासून सुमारे 9 किलोमीटर अंतरावर शिवनाळा हे छोटेसे गाव आहे. या गावात 100 टक्के आदिवासी समाजातील लोकवस्ती आहे. गावापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर यवतमाळ-चंद्रपूर हायवे आहे. 10 वर्षांआधी येथे रस्त्याचे काम करून शिवनाळा फाट्याला हायवेसोबत जोडले गेले होते. मात्र इतक्या वर्षात या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. त्यामुळे रस्त्याच्या कामासाठी 35 लाखांचा निधी मंजूर झाला होता.

काही महिन्यांआधी जिल्हा परिषदेअंतर्गत या कामाला सुरुवात झाली होती. अर्धा रस्ता पूर्ण झाला होता तर अर्ध्या रस्त्याचे काम बाकी होते. मात्र अपूर्ण काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा गावक-यांचा आरोप होता. रस्त्यावर टाकण्यात आलेल्या भराची दबाई योग्य प्रकारे झाली नाही, रस्त्याच्या कामासाठी अत्यल्प प्रमाणात डांबराचा वापर होतोय. तसेच जुना रस्ता न खोदता त्यावरच गिट्टी व चुरी टाकण्यात आल्याने डांबरीकरणाच्या आधीच रस्ता उखडून गिट्टी वर येत असल्याचा आरोप गावकरी करीत होते. रस्त्याचे काम इस्टिमेटनुसार न झाल्यास गावक-यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता.

‘वणी बहुगुणी’ने याबाबत वृत्त प्रकाशित करीत सर्वप्रथम ही बाब समोर आणली. वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाला खडबडून जागी आली व इस्टिमेटनुसार कामाला सुरूवात झाली. नुकताच हा रस्ता पूर्ण तयार झाला असून गावक-यांनी कामाबाबत समाधान व्यक्त करीत ‘वणी बहुगुणी’चे आभार मानले.

याबाबत वणी बहुगुणीमध्ये प्रकाशित झालेली बातमी…

शिवनाळा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, गावकरी संतप्त

Comments are closed.