वणी लायन्स हायस्कूल – कनिष्ठ महाविद्यालयात कायदेविषयक शिबिर
विद्यार्थ्यांच्या शंका दूर करून कायदेविषयक जागरूकता निर्माण
पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुका विधी सेवा समिती वणी व लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट वणी यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन व साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे उपाध्यक्ष लायन बलदेव खुंगर यांनी भूषविले. प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून दिवाणी न्यायाधीश पी.एस. जोंधळे (वरिष्ठ स्तर, वणी), न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी एन.बी. बिरादार, सरकारी वकील माधुरी वायचाळ, सहाय्यक सरकारी अभियोक्ता ऍडव्होकेट रेखा तेलंग, ऍडव्होकेट पूजा मत्ते, ऍडव्होकेट धनंजय आसुटकर, ऍडव्होकेट दादा ठाकूर, लायन्स क्लबचे उपाध्यक्ष डॉ. विजय राठोड, अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे व प्राचार्य चित्रा देशपांडे उपस्थित होते.
न्यायाधीश जोंधळे यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक हक्क व कर्तव्यांची माहिती दिली. विविध विधी सेवा योजनांची ओळख करून देत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा मानस व्यक्त केला. शिक्षणासोबतच चारित्र्य विकासावरही विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला त्यांनी दिला.
ऍडव्होकेट धनंजय आसुटकर यांनी “कायद्याचे ज्ञान दारोदारी, अज्ञानाचा अंधकार दूर करी” या सुविचाराचा धागा धरून विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा, नार्कोटिक व मादक पदार्थ, बॅड टच–गुड टच, बालमजुरी, बालकांवरील अत्याचार व लैंगिक शोषण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी झाल्यास कायद्यानुसार कठोर शिक्षा होऊ शकते, म्हणून विद्यार्थ्यांनी अशा गोष्टींपासून दूर राहावे, असे त्यांनी प्रतिपादन केले.
यावेळी ऍडव्होकेट पूजा मत्ते, ऍडव्होकेट दादा ठाकूर, ऍडव्होकेट रेखा तेलंग व ऍडव्होकेट माधुरी वायचाळ यांनीही विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करून त्यांच्या शंका दूर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक किरण बुजोणे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनील घाटे यांनी मानले.



Comments are closed.