राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा

काँग्रेस व शिवसेना (उबाठा) गटाकडून अपेक्षित साथ न मिळाल्याचा आरोप

विवेक तोटेवार, वणी: वणी नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीत निर्माण झालेल्या मतभेदांचा परमोच्च बिंदू गाठत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. 15 नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

पत्रकार परिषदेत पक्षाने काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून अपेक्षित साथ न मिळाल्याचा आरोप केला. आघाडीतील चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसला गौण समजून निर्णय घेण्याचा प्रयत्न झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. अखेर या नाराजीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने स्वतंत्र निवडणुकीचा मार्ग स्वीकारला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वणी नगर परिषदेतील 14 प्रभाग व नगराध्यक्ष पदांसाठी एकूण 29 नगरसेवक निवडले जाणार असून, या निवडणुका 2 डिसेंबर 2025 रोजी पार पडणार आहेत. मागील काही दिवसांपासून काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्यात आघाडीबाबत चर्चा सुरू होती, मात्र कोणताही तोडगा निघू शकला नाही.

या पत्रकार परिषदेस प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण, कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आबिद हुसेन, विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, जिल्हा उपाध्यक्ष समीर बेग, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष अरबाज पठाण, तालुका अध्यक्ष राजू वांढरे, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मतदारांना सचोटीने विकास करणाऱ्या उमेदवारांना संधी द्यावी, असे आवाहन केले. तसेच इच्छुक उमेदवारांनी रज्जाक पठाण, विनोद ठेंगणे यांच्याशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले.

Comments are closed.