अखेर वणीच्या ठाणेदाराने अवैध धंद्यावर आणली टाच
विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यावर अखेर वणीचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी सोमवारपासून टाच आणली आहे. यामुळे अवैध धंदे चालणा-या परिसरात सध्या तरी शुकशुकाट दिसून येत आहे. वणी परिसरात उघडपणे मटका, अवैध दारू, कोळसा तस्करी सुरू होती.
वणी परिसरात वेकोलिच्या जवळपास वीस कोळसा खाणी आहेत. त्यामुळे वणीची अर्थव्यवस्था व पर्यायाने बाजारपेठ समृद्ध मानली जाते. सहाजिकच वणी शहर व परिसरात अवैध धंदे कधी उघड तर कधी छुप्या पद्धतीने चालू असतात. याबाबत अनेकदा सुजान नागरिकांकडून ओरड सुद्धा सुरू होती. बरेचदा पोलीस प्रशासन अवैध धंद्यावर जरब बसवायला कमी पडते. परंतु वणीचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी या अवैध धंद्याविरुद्ध 2 एप्रिल सोमवारपासून बेधडकपणे टाच आवळायला सुरुवात केली.
‘वणी बहुगुणी’शी बोलताना बाळासाहेब खाडे यांनी वणी शहर व परिसरात छुप्या पद्धतीने अवैध धंदे काही प्रमाणात सुरु असल्याची कबुली देताना आपल्यावर या प्रकरणी सध्यातरी कोणत्याही प्रकारचा दबाव नसल्याचे स्पष्ट केले. पण ही कारवाई अशीच चालू ठेवणार असून आपण कोणत्याही दबावापुढे झुकणार नसल्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली.
कालपासून कुठे उघडपणे तर कुठे छुप्या पद्धतीने चालणारे अवैध धंदे बंद झाल्यामुळे व बाळासाहेब खाडे यांच्या या कठोर भूमिकेमुळे अवैध धंदे करणारे व्यावसायिक सध्या भूमिगत झाल्याचे चित्र आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी वरिष्ठांच्या दबावामुळे व नाराजीमुळे ही कारवाई सुरू केली की या मागचे आणखी काही वेगळे कारण आहे याबाबत विविध तर्क लावले जात आहे. तर दुसरीकडे कोळसा तस्करांच्या छुप्या वादातून ही कार्यवाही सुरू झाल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. दुसरीकडे मात्र सर्वसामान्य वणीकर अशा पद्धतीची कार्यवाही पोलीस प्रशासनाने सातत्याने केली पाहिजे असे मत व्यक्त करीत आहे…
लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ….