रंगनाथ स्वामी मंदिरात रंगणार वैकुंठ महोत्सव सोहळा

दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी, भाविकांना आवाहन

बहुगुणी डेस्क, वणी : वणी शहरातील प्रसिद्ध श्री रंगनाथ स्वामी मंदिरात मंगळवार, दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी वैकुंठ चतुर्दशी निमित्ताने वैकुंठ महोत्सवाचे भव्य आणि भक्तिरसाने ओथंबलेले आयोजन करण्यात आले आहे. दिवसभर चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमांत विविध धार्मिक विधी, उपासना, प्रवचन आणि भव्य दीपोत्सवाने मंदिर परिसर भक्तिमय रंगणार आहे.

सकाळी 10 वाजता दांपत्यांच्या हस्ते श्री रंगनाथ स्वामींच्या मूर्तीचा महाअभिषेक होऊन महोत्सवाचा शुभारंभ होईल. त्यानंतर दुपारी 1 ते 2 दरम्यान ब्रह्मांडनायक श्री गजानन महाराज उपासना मंडळ, वणी तर्फे सामूहिक उपासना होईल. दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन आहे.

दुपारी 4 ते 7 या वेळेत ह.भ.प. मनुमहाराज तुगनायत संच यांच्या कीर्तनमय कार्यक्रमात विष्णुसहस्रनामावली पठन व भक्तिगीतांचा सुरेल संगम होईल. सायंकाळी 7 ते 8 यज्ञ सेवा समिती तर्फे सामूहिक श्री सूक्त हवन पार पडेल. त्यानंतर रात्री 8 ते 9 दरम्यान धार्मिक देखावे (झांकी) सादर करण्यात येतील.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

रात्री 9 ते 12 दरम्यान दीपोत्सव, हरिहर मिलन, ब्रह्मोत्सवातील छप्पन भोग व महाआरतीने या दिव्य सोहळ्याची सांगता होईल. संपूर्ण कार्यक्रमाचे पौरोहित्य हिंगणघाट येथील पं. गोविंद महाराज जोशी करणार असून, दक्षिण भारतातील वेदशास्त्र संपन्न पंडित तसेच वाद्यवृंदाच्या उपस्थितीत विधी पार पडतील.

भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहून घरून 250 ग्रॅम मिठाई छप्पन भोगासाठी आणावी, तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments are closed.