बहुगुणी डेस्क, वणी: चप्पल परत देण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय युवकावर टिळक चौक परिसरात लाकडी काठीने हल्ला करून मारहाण केला. ही घटना गुरुवारी (दि. 9 जुलै) रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी तिघांसह एका अल्पवयीन मुलावर वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जिनान जुबेर खान (वय 18) हा भीमनगर, वणी येथील रहिवासी आहे. गुरुवारी सायंकाळी त्याला चिखलगाव येथे राहणा-या त्याच्या एका मित्राचा कॉल आला. त्याने सांगितले की त्याच्या घरी थोडा वाद सुरु आहे. त्यामुळे तू मित्रांसह घरी ये, असा निरोप दिला. जिनान हा त्याच्या तीन मित्रांसह चिखलगाव येथे गेला. दरम्यान तिथे आरोपी उपस्थित होते. यावेळी मध्यस्थी करत असताना एका आरोपीला जिनानचा धक्का लागला. त्यामुळे वातावरण आणखी तापले. त्यानंतर ते तिघेही युवक तेथून निघून गेले.
चप्पल देण्याच्या बहाण्याने बोलावले
काही वेळाने धक्का लागलेल्या एका आरोपीने जुनानला कॉल केला. त्याने त्याची चप्पल चिखलगाव येथील वाद झालेल्या घरी राहिली आहे. ही चप्पल टिळक चौकात आणून देण्यास सांगितले. त्यानुसार जिनान व त्याचे मित्र चप्पल घेऊन टिळक चौकात पोहोचले. जिनान चप्पल देण्यासाठी जवळ जाताच एका आरोपीने त्याच्या हातातील लाकडी काठीने जिनानच्या डोक्यावर प्रहार करून जखमी केले. त्यानंतर इतर तिघांनी लाथा बुक्क्यांनी जिनानला शिविगाळ करत मारहाण केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
मारहाणीनंतर जिनानने वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी चारही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 115(2), 118(1), 3(5), 351(2), 351(3) व 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.


Comments are closed.