मारेगावात प्रभाग क्र. 12 मध्ये तीव्र पाणी टंचाई
प्रभागात एकही हँडपम्प नाही, महिलांनी दिले निवेदन
ज्योतिबा पोटे, मारेगाव: पावसाळा संपताच शहरातील प्रभाग क्र. १२ मधे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नळ योजना अंतर्गत पाईप लाईन टाकून नगर पंचायतीने हा प्रश्न सोडवावा यासाठी स्थानिक महिलांनी नगराध्यक्ष इंदू किन्हेकर यांना निवेदन दिले.
शहरातील प्रभाग 12 मध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. दिवसेंदिवस ही पाणी टंचाई तीव्र होत असून त्याचा भडका आता उडताना दिसत आहे. या प्रभागाची लोकसंख्या 268 असून या वार्डामध्ये पाण्याची कुठलीही ठोस व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिकांना कठिन परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या प्रभागात यवतमाळचे माजी आमदार बाजोरिया यांच्या निधीतून एक बोअरवेल खोदण्यात आला होता. पण त्याला पाणी न लागल्यानं त्याचा काहीही फायदा झाला नाही.
पावसाळ्यातच ही परिस्थिती असताना उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा आणखी तीव्र होणार आहे. त्यामुळे आजच पालिका प्रशासनानं ठोस उपाय योजना करावी अशी मागणी महिलांनी केली आहे. या प्रभागात गेल्या 20 वर्षांपासून पाण्याची कोणतीही व्यवथा केली गेली नसल्याचे या वार्डातील नागरिकांचे म्हणणे आहे.
यावेळी प्रभाग क्रमांक 12 ची पाणी समस्या सोडवण्यासाठी लवकरच उपाययोजना करण्यात येईल असं आश्वासन नगराध्यक्ष इंदूताई किन्हेकार यांनी महिलांना दिले. या वेळेस प्रभागाच्या सदस्या भेले यांच्यासह उषा कोरले, किनाके, खाडे इत्यादी महिला उपस्थित होत्या.