राष्ट्रधर्म तत्वज्ञान प्रचार यात्रेचे वणी येथे उत्साहात स्वागत

रविवारी झाले वणीत आगमन,

0

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी मोझरी येथून निघालेल्या राष्ट्रधर्म तत्वज्ञान प्रचार यात्रेचे वणी तालुक्यातील राष्ट्रधर्म युवा मंच, विश्वव्यापी गुरुदेव सेवा मंडळ व राष्ट्रसंत युवक युवती मंचच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. ही प्रचार यात्रा नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, भद्रावती या मार्गे वणी येथे दि. 8/8/2021 ला दुपारी 3.00 वाजता दाखल झाली.

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महासमाधी गुरुकुंज आश्रम मोझरी, येथील आचार्य वेरूळकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनात कार्य करीत असलेल्या राष्ट्रधर्म युवा मंच केंद्रीय कार्यकारिणी ची प्रचार यात्रा गुरुकुंज आश्रम मोझरी येथून दिनांक 6 ऑगस्ट 2021 ला अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे यांच्या हस्ते पूजन करून भगवी झेंडी दाखवण्यात आली.

राष्ट्रसंतांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून ह्या कार्यक्रमाची सुरवात झाली. वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महान विचारांचा प्रचार – प्रसार युवा पिढीत रुजावा व तो वृद्धिंगत व्हावा व भरकटत चाललेल्या नव-युवकांना योग्य दिशा मिळावी तो एकसंघ होऊन त्यातून एक नवा मानव समाज निर्माण व्हावा ह्यासाठीच राष्ट्रधर्म युवा मंचची स्थापना झालेली आहे असे मत यावेळी केंद्रीय अध्यक्ष डॉ. रामेश्वर बरगट यांनी मांडले.

आचार्य वेरुळकर गुरुजी व गीताचार्य तुकाराम दादा यांच्या सानिध्यात आजपर्यंत एक लाखाहूनही अधिक राष्ट्रसंताच्या विचाराचे युवक घडलेले आहेत. फक्त युवा वर्गच नवे राष्ट्र घडवू शकतो, राष्ट्रसंताच्या विचारांचा सशक्त भारत घडविण्याची ताकत फक्त युवा मनगटातच आहे, त्यामुळे कुठल्याही विरोधाची तमा न बाळगता गुरुदेवाचे कार्य करीत रहा, केंद्रीय कमेटी आपणास नेहमी सहकार्य करत राहील असेही ते पुढे म्हणाले.

त्यांनतर नरेंद्र तराळे, मनीष देशमुख, विनोद वेरूळकर, मनोज महाराज चौभे, रामदास देशमुख, अनंत वडोदे ह्या केंद्रीय प्रचारकांचीही छोटेखानी भाषणे झाली. त्यांनतर ही प्रचार यात्रा यवतमाळ कडे मार्गस्थ झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी राष्ट्रधर्म युवा मंच, विश्वव्यापी गुरुदेव सेवा मंडळ व राष्ट्रसंत युवक युवती विचार मंचच्या सर्व पदाधिकारी व सभासदांनी सहकार्य केले.

हे देखील वाचा:

वणीतील पहिल्या फॅशन व इंटेरिअर इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश सुरू

आता अवघ्या 1.5 हजारात कुंपन झटका मशिन

Leave A Reply

Your email address will not be published.