विवेक तोटेवार, वणी: जॅकी चेनचा ‘हु आय ऍम’ हा सिनेमा आपण टीव्ही बघितला असेलच. यात जॅकी चेन एक अपघात झालेल्या व्यक्तीला तिथे उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून प्रथमोपचाराद्वारे वाचवतो. हा सिन खूपच प्रसिद्ध आहे. अगदी त्याच सिनची प्रचिती शनिवारी वणीत आली. अपघात झालेल्या एका व्यक्तीला वेकोलिच्या एका कर्मचा-याने झाडं, फांदी, बॉटल, दुपट्टा, रुमाल याचा वापर करून त्याला प्रथमोपचार करून त्याचा जीव वाचवला व त्याला ताबडतोब उपचारासाठी दाखल केले.
सत्यवान पोहे हे रा. इजपूर ता. कोरपना येथील रहिवाशी असून ते शनिवारी 4 जुलै रोजी कामानिमित्त वणीला आले होते. दुपारी 3 वाजताच्या सुमारास ते काम आटपून वणीहून गावी परत जात होते. दरम्यान लालगुडा चौकात अज्ञात वाहनाने त्यांना मागून धडक दिली. (प्रत्यक्षदर्शीच्या मते ते वाहून छोटा हत्ती होते व एमआयडीसी परिसरातून चुकीच्या दिशेने येत होते.) वाहनाने धडक देताच वाहन चालक गाडीसह घटनास्थळाहून पसार झाला. या अपघातात सत्यवान जखमी होऊन त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान या रस्त्याने वेकोलिचे कर्मचारी संकेत अरुण खोकले हे जात होते.
संकेत खोकले हे वेकोलिच्या नायगाव माईन्स येथे नोकरीवर असून ते वणीतील माळीपुरा येथील रहिवाशी आहे. दुपारी ते खाणीतून कर्तव्यावरून वणीला परत येत होते. त्यांना लालगुडा चौपाटीवर दहा बारा लोक उभे असलेले दिसले. गर्दी पाहून त्यांनी गाडी थांबवली. तेव्हा त्याना तिथे एका दुचाकीस्वाराचा अपघात झाल्याचे दिसून आले.
तिथली परिस्थिती खूप गंभीर होती. जखमी सत्यवानच्या पायाला गंभीर दुखापत प्रचंड रक्तस्राव सुरु होता. त्यांच्या डाव्या पायाचे हाड संपूर्ण तुटले होते. केवळ मांसाच्या आधारावर त्यांचा पाय जुळून होता. त्यांनी वेळ न दवडता प्रथमोपचार करण्याचा निश्चय केला. यासाठी त्यांनी तिथल्या लोकांची मदत घेतली. सर्वात आधी त्यांनी रक्तस्त्राव थांबण्यासाठी रिकाम्या बिस्लेरीच्या बॉटल गोळा करून त्याचा पायाला आधार देऊन रस्कस्राव थांबवला.
त्यानंतर त्यांनी एकाला झाडाची फांदी तोडून आणायला लावली. त्या फांदीच्या आधारे त्यांनी पायासाठी एक तात्पुरता सपोर्ट तयार केला. या कामात कुणी त्यांना रुमाल दिला तर कुणी दुपट्टा दिला तर एकाने पिशवीतील शर्ट काढून दिला. फांदी कपडा त्याच्या आधारे त्यांनी पायाला तात्पुरते बँडेज तयार केले.
हा प्रथमोपचार होताच त्यांनी ऍम्बुलन्सला कॉल केला. मात्र ऍम्बुलन्स येण्यास उशिर होता व दरम्यान पाऊसही सुरू झाला होता. अखेर त्यांनी एक ऍटो थांबवून जखमीला ग्रामीण रुग्णालयात आणले. दरम्यानच्या काळात रुग्ण घाबरू नये म्हणून एका व्यक्तीला त्याच्यासोबत बोलायला ठेवले. अखेर सत्यवानवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू झाले. सध्या त्याची परिस्थिती धोक्याबाहेर आहे. मात्र पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
वेकोलित मिळाले होते रेस्क्यूचे ट्रेनिंग – संकेत खोकले
मी वेकोलिच्या माईन्स रेस्क्यू टीमचा (बचाव पथक) मेंबर आहे. त्यामुळे अपघाताच्या वेळी काय करावे याचे संपूर्ण ट्रेनिंग मला कंपनीकडून आधीच मिळालेले होते. आपतकालीन परिस्थितीत किंवा अपघात झाल्यास काय प्रथमोपचार करावे याची संपूर्ण माहिती होती. सहज शक्य होईल त्या साहित्याच्या आधारावर मी जखमीवर प्रथमोपचार केला. यात लोकांनीही मदत केली. आज त्यांचा जीव धोक्याबाहेर असल्याचे कळाल्याने आनंद झाला आहे.
– संकेत खोकले, वेकोलि कर्मचारी
अपघात झाल्यास लोक तिथून पळ काढतात. अनेक जखमींचा तर केवळ मदतीसाठी कुणी समोर न आल्याने रक्तस्राव होऊन जीवही जातो. मात्र संकेत आणि घटनास्थळी उपस्थित असलेले व्यक्ती अशा बिकट परिस्थितीत केवळ समोरच आले नाही, तर मदत करून. प्रथमोपचार करून त्यांनी जखमीला तातडीने उपचारासाठी दाखल करून मानवतेचा संदेश दिला. या कार्याबाबत संकेतचे वणी व परिसरात कौतुक होत आहे. ‘वणी बहुगुणी’ही अशा योद्ध्यास सॅल्यूट करते.