जितेंद्र कोठारी, वणी: शेतात सोयाबीन काढण्यासाठी आलेल्या मजुराचा थ्रेशर मशीनमध्ये अडकून जागीच मृत्यु झाल्याची घटना शनिवार 30 ऑक्टो. रोजी दुपारी झरी तालुक्यातील खडकी (गणेशपुर) येथे घडली. विलास भूदाजी तोडासे (55), रा. भाराडी, जि. चंद्रपूर असे मृत मजुराचे नाव आहे. या घटनेत मृताच्या शरीराची चाळणी झाली असून वृत्त लिहीपर्यंत मृतदेह काढण्याचे काम सुरूच होते.
सध्या गावागावात सोयाबीन काढणी व कापूस वेचणीचे कामे जोमाने सुरु आहे. तालुक्यात मजुरांची कमतरता असल्याने दुसऱ्या तालुक्यातून तसेच परजिल्ह्यतुन मजूर बोलावून कापूस वेचणी व सोयाबीन काढणीचे कामे सुरू आहे. अशातच खडकी शेत शिवारात विठ्ठल ठावरी यांच्या शेतात थ्रेशर मशिनद्वारे सोयाबीन काढण्यात येत होते. मृत विलास तोडासे हा देखील चंद्रपूर जिल्ह्यातून खडकी येथे ठावरी यांच्या शेतात मजुरीसाठी आला होता.
आज दुपारी 3 वाजता दरम्यान थ्रेशर मशीन चालू असताना मजूर विलास तोडासे हा मशीनवर चढण्याचा प्रयत्नात होता. मात्र तिथे त्याचा तोल गेला व तो कन्व्हेअर बेल्टवर पडला. वेगाने सुरु असलेल्या कन्व्हेअर बेल्टमुळे विलास डोक्याच्या बाजूने मशीनमध्ये ओढला गेला. घटनास्थळी हजर इतर मजुरांनी तात्काळ थ्रेशर मशीन बंद केली. मात्र तोपर्यंत विलासचा कमरेपर्यंतचा भाग मशीन मध्ये अडकून चेंदामेंदा झाला होता.
घटनेची माहिती मिळताच मुकुटबन पोलीस घटनास्थळी पोहोचले. बातमी लिहिपर्यंत (रात्री 8 वाजता) मशीन ऑपरेटर व मजुरांच्या साहाय्याने छिन्नभिन्न मृतदेह मशीनमधून बाहेर काढण्याचे कार्य सुरु होते. दरम्यान घटनास्थळी मोठ्या संख्येत बघणाऱ्यांची गर्दी जमली आहे. मृतकाच्या नातेवाईकांना घटनेबाबत सूचना देण्यात आली असून ते अद्याप पोहचले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.