येदलापूरच्या निकृष्ट वॉलकंपाउंडची अधिकाऱ्यांनी केली पाहणी

क्वालिटी कंट्रोल बोर्डाकडे तक्रार झाली फॉरवर्ड

0

सुशील ओझा, झरी: येदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडचे काम निकृष्ट केल्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पालकमंत्री यांच्याकडे शिवसेनेचे पदाधिकारी दयाकर गेडाम यांनी केली. त्या अनुषंगाने उपकार्यकारी अभियंता एस. डी. मानकर, गटविकास अधिकारी सुधाकर जाधव व शाखा अभियंता आर. एच. कोरेटी यांनी १४ डिसेंबरला दुपारी येदलापूर शाळेच्या चौकशीकरिता भेट देऊन पाहणी केली. तक्रारकर्ते दयाकर गेडाम व तालुक्यातील पत्रकार त्यावेळी उपस्थित होते.

गेडाम यांनी अधिकारीवर्गाला चारही दिशांनी पडलेल्या एकूण सात भेगा दाखविल्या. तसेच जमीन लेवलच्यावर लेंटर टाकल्याने भिंत उंच झाली. भिंतीच्या खाली आरपार खोल भगदाड अनेक ठिकाणी पडले आहे. सुरक्षाभिंत आतून बाहेर किंवा बाहेरून आत कुणी येऊ नये याकरिता बांधली जाते. परंतु शाळेच्या सुरक्षाभिंतीतून मोठे साप, विंचू व इतर सरपटणारे प्राणी व किडे येण्याची भीती निर्माण झाली आहे.

या प्राण्यांमुळे शाळेतील मुलांच्या जीवाचा प्रश्नसुद्धा निर्माण झाला आहे. चौकशी दरम्यान दयाकर गेडाम यांनी भिंतीवर भेगा पडलेल्या प्रत्येक ठिकाणी प्लास्टिक पेंट लावून भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न ठेकेदाराने कसा केला ते उघडीस आणून दिले. ठेकेदार हा लोकप्रतिनिधींची दिशाभूल करून जुन्या भिंतीवरची एकच भेगा दाखवून नवीन भिंतीवरील सातही भेगा लपवीत होता. त्याचे काम चांगले असल्याचे सांगत होता.

काम चांगले होते तर १५ दिवसांतच नवीन भिंतींना भेगा पडल्या कुठून ? पडलेल्या भेगा प्लास्टिक पेंटने मिटविण्याची काय गरज? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. वॉलकंपाउंडच्या कामात रेतीऐवजी काळी चुरी व डस्टचा वापर करून छपाई करीत असल्याचे व्हिडिओसुद्धा गेडाम यांनी चौकशीकरिता आलेल्या अधिकाऱ्यांना दाखविले.

तरी निकृष्ट केलेले वॉलकंपाउंडचे बांधकाम तोडून नवीन सुरू करावे अशी मागणी गेडाम यांनी केली आहे. विशेष म्हणजे या वॉलकंपाउंडला रंगरंगोटीचे काम ग्रामपंचायतीच्या गरीब चपराशी यांच्याकडून करून घेतले. परंतु अजूनपर्यंत ठेकेदाराने त्यालाही एक रूपया दिला नाही. वॉलकंपाउंडचे बिल निघाल्यावर देतो असे ठेकेदाराने सांगितल्याचे ग्रामपंचायत चपराशी गणपत भोयर यांनी सांगितले.

संपूर्ण चौकशी होईल

वॉलकंपाउंड बाबतची तक्रार आम्ही क्वालिटी कंट्रोल बोर्ड व जिल्हा परिषद पातळीवर स्टेट क्वालिटी मॉनिटर ( SQM) कडे करण्यात आली असून पाच ते सहा दिवसात याची संपूर्ण चौकशी होऊन कार्यवाही होणार.

एस. डी. मानकर, उपकार्यकारी अभियंता

हेदेखील वाचा

मारेगावचे माजी सरपंच उत्तमराव गेडाम यांचे निधन

हेदेखील वाचा

महाज्योतीमार्फत जेईई-नीट परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण

Leave A Reply

Your email address will not be published.