झरी तालुक्यातील 7 गावे 70 तास अंधारात !
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली परिसरात वादळी वाऱ्यामुळे 5 मे रोज दुपारला विद्युत पुरवठा खंडित झाला व त्याच दिवशी वीज पडून मांगली (नवीन) येथील शेतमजूर टेकाम याचा मृत्यू झाला होता. वादळामुळे मांगली परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला परंतु जवळपास 70 तास वीज पुरवठा न झाल्याने परिसरातील मांगली (नवीन), हिरापूर, हिरापूर (जुना) राजूर, बैलमपूर, पिंपरड, पठार या 7 गावांतील नागरिकांना त्रास झाला. ग्रामपंचायतीद्वारे होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला. लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत पाण्यासाठी भटकत असल्याचे दिसत आहे.
ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना लाईन नसल्याने घरातील लहान मुलांना हवेसाठी साधा पंखा व कुलर चालवण्याकरिता लाईन नसल्याने हाल झाले. तर शेतात काम करणाऱ्या मजूर यांना पिण्याकरीता रात्रपाळीत बोअर असून पाणी मिळत नसल्याने कामावर जाण्याकरिता मागेपुढे करत. शेतात पिकांना पाणी देण्याकरिता लाईन नसल्याने बोअरवेल असून नसल्यासारखे झाले. ज्यामुळे शेतकऱ्यांचे पीक व भाजीपाला वाळत आहे. वीज खंडित असल्याने वरील सर्व गावातील पिठगिरण्याही बंद असल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागला.