चक्क पत्रकार पतीनेच दिली शिक्षक पत्नीला जीवे मारण्याची सुपारी

बसची वाट पाहताना शिक्षिकेवर झाला होता प्राणघातक हल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी बेलोरा फाट्यावरून चंद्रपूर येथे घरी परत जाताना एका शिक्षिकेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. हल्ला झाल्याच्या काही वेळातच घटनास्थळावरील काही लोकांनी पाठलाग करत हल्लेखोराला पकडले. मात्र या प्रकरणाचा मास्टरमाईंड आता समोर आला असून या शिक्षिकेचा पत्रकार असलेला पतीच या हल्ल्यामागील सूत्रधार असल्याचे समोर आले आहे.

सविस्तर वृत्त असे की वैशाली दादाजी चल्लावार (40) या चंद्रपूर येथील सिविल लाईन भागातील रहिवाशी असून त्या वणी तालुक्यातील नायगाव (बु) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. त्यांचे सन 2010 मध्ये पत्रकार असलेल्या जितेंद्र रामचंद्र मशारकर याच्याशी लग्न झाले होते. त्या रोज शाळेसाठी चंद्रपूर ते नायगाव असे बसने अपडाऊन करतात. गुरुवारी दिनांक 18 ऑगस्ट रोजी त्या नेहमी प्रमाणे शाळेत गेल्या होत्या. संध्याकाळी 5 वाजता शाळा सुटल्यानंतर त्या बससाठी बेलोरा फाट्यावर आल्या होत्या.

5.30 वाजताच्या सुमारास स्टॉपवर वैशाली यांना चंद्रपूर येथे दुचाकीने जाणारा एक परिचित भेटला. त्या परिचिताला त्यांनी लिफ्ट मागत चंद्रपूर येथे सोडण्याची विनंती केली. दरम्यान दुचाकीवर बसताना एका काळा टीशर्ट आणि निळी जिन्स पॅन्ट घातलेला एक तरुण वैशाली यांच्या जवळ आला व त्याने चाकूने वैशाली यांच्यावर हल्ला केला. हल्ला चुकवताना त्यांना कानाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान या घटनेमुळे झालेला आरडाओरड ऐकून परिसरातील लोक व उपस्थित शिक्षकांनी हल्लेखोराकडे धाव घेतली. त्यामुळे हल्लेखोरांने तिथून पळ काढला.

जखमी झालेल्या वैशालीला त्यांच्या शाळेतील शिक्षक व शिक्षिकेने घुग्गुस येथील एका दवाखान्यात दाखल केले. दरम्यान नायगाव येथील लोकांनी हल्लेखोराचा पाठलाग करत परिसरातील एका शेताजवळ पकडले. हल्लेखोराचे नाव मोहम्मद राजा अब्बास अंसारी (20) मुळचा बिहारी पण हल्ली मुक्काम चंद्रपूर असे आहे. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले.

मोहम्मदला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता पोलिसांना धक्कादायक माहिती कळली. शिक्षिकेचा पती असलेला जितेंद्र मशारकर (45) रा. चंद्रपूर यानेच जिवे मारण्याची सुपारी दिल्याचे समोर आले. पोलिसांनी जितेंद्र मशारकरला चौकशीसाठी बोलवून त्यााल अटक केली. या प्रकऱणी हल्लेखोर मोहम्मद पती जितेंद्रसह संजय राजेश पट्टीवार (30) रा. चंद्रपूर याला अटक केली. तसेच या घटनेतील आणखी एक आरोपी पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मास्टरमाईड पतीने हल्लेखोरांना सुपारी दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याआधीही शिक्षिकेवर दोन वेळा अज्ञाताकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे त्या बसने चंद्रपूरला ये-जा करत असल्याची माहिती आहे. 

या प्रकरणी तिन्ही आरोपींविरोधात भादंविच्या कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका दिवसाच्या आत शिरपूर पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार व सपोनि गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रामेश्वर कांडुरे करीत आहे.

हे देखील वाचा:

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 6 जणांना अटक

नोकरी: शेवाळकर डेव्हलपर्समध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजेत

लाल सिंग चढ्ढा, रक्षाबंधन सिनेमाला झोपवणारा ‘कार्तिकेय 2’ वणीत रिलिज

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये आजपासून ‘फ्रीडम’ ऑफरला सुरुवात

मयूर मार्केटिंगमध्ये 15 ऑगस्टपासून अमृत महोत्सव महासेल सुरू

 

 

Comments are closed.