जितेंद्र कोठारी, वणी: वणी तालुक्यात अवैध वाळू उपसा व्यवसाय राजरोसपणे सुरू असताना बुधवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखा पथकाने वर्धानदीवर असलेल्या रांगणा गावाच्या रेतीघाटावर छापा मारून रेती भरलेले दोन ट्रॅक्टर व एक स्विफ्ट कार जप्त केली. पथकाने दोन्ही ट्रॅक्टरच्या चालकासह स्विफ्ट कार मधील 3 जणांना अटक केली आहे.
जिल्ह्यातील एकही रेती घाटांचे यंदा लिलाव झालेले नसताना वणी महसूल विभाग अंतर्गत रांगणा व भुरकी रेतीघाटातून सायंकाळी 6 ते पहाटे 5 वाजे पर्यन्त ट्रॅक्टर, ट्रक, हायवाने रेती वाहतूक सर्रास सुरू असल्याची अनेक तक्रारी येत असताना महसूल विभागाने जणू वाळू तस्करांना गौण खनिज लुटण्याची खुली सूट दिल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे गुप्त सूचनेवरून बुधवार दि.27 मे रोजी रात्री यवतमाळ जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा पथकाने धाड टाकून रेती भरलेले दोन ट्रॅक्टर, ट्रॅक्टरच्या पुढे पायलट कार म्हणून चालणारी स्विफ्ट कार व 5 मोबाईल फोन असे एकूण 17 लाखाचा मुद्देमाल जप्त केले.
स्था.गु.शाखा पथकाने जप्त केलेले ट्रॅक्टर, कार आणि मोबाईल फोन वणी पोलिसांच्या ताब्यात देऊन रेती तस्कर हरीश दिगाम्बर पाते, मयूर पांगुळ, आतिष खडतकर सर्व रा.वणी तसेच ट्रॅक्टर चालक विनोद तुळशीराम पारखी रा. वागदरा व राहुल राजेंद्र चटकी, रा.सेलू विरुद्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सर्व आरोपीविरुद्ध कलम 379 अन्वये कारवाई करून आरोपीने वणी न्यायालयात हजर केले असता सर्व आरोपींना जामीन मंजूर झाला. सदर कारवाई स्था.गु.शाखेचे पोलीस उप निरीक्षक श्रीकांत जिंदमवार, जमादार गजानन डोंगरे, उल्हास कुरकुटे, किशोर यांनी पार पाडली.
कोरोना या आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे प्रशासन नियोजनात व्यस्त असल्याचा फायदा उचलून रेती तस्कर आपले उखळ पांढरे करण्यात दंग आहे. यामुळे वणी तालुक्यात अवैध रेती व्यवसाय चांगलेच फोफावल्याचे चित्र दिसून येत आहे. रात्री बेरात्री होणाऱ्या या वाळू वाहतुकीमुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.