कॉरेन्टाईनने गाठले अर्धशतक, 43 जणांचे स्वॅब तपासणीसाठी
पार्टीत सहभागी झालेले अर्धेअधिक कोविड केअर सेंटरमध्ये
जब्बार चीनी, वणी: वणीमध्ये कोरोनाचे तीन रुग्ण आढळताच प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत कॉरेन्टाईन करण्याचा वेग वाढवला. आज कॉरेन्टाईन झालेल्या व्यक्तींनी अर्धशतक गाठले. सध्या परसोडा येथील कोविड केअर सेंटरमधल्या विलगीकरण कक्षात 48 तर 6 व्यक्तींना होम कॉरेन्टाईन करण्यात आले आहे. त्यामुळे हा आकडा 54 झाला. काल 15 लोकांचे स्वॅब घेण्यात आले होते तर आज आणखी 28 अशा एकून 43 जणांचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आले. काल रात्री पाठवण्यात आलेल्या स्वॅबचा आज संध्याकाळ उशिरा पर्यंत किंवा उद्या रिपोर्ट येऊ शकतो अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.
गड्या अपुला गाव बरा….
वणीत अचानक 3 कोविड रुग्ण सापडताच एकच खळबळ उडाली. रुग्ण सापडल्याची बातमी वा-यासारखी पसरताच वणीकर दक्ष झालेत. लोकांनी घराबाहेर पडणे टाळले. परिणामी आज मार्केटमध्ये गर्दी कमी झालेली दिसून आली. भाजीपालाही लोकांनी दुरूनच खरेदी केला. काही दिवसांपासून गायब झालेले सॅनिटायजर अचानक अनेक दुकानात दिसू लागले. कुणी बाहेर निघाल्यास रुमाल, स्कार्फ व मास्क बांधूनच बाहेर पडले. महत्त्वाचं म्हणजे खरेदी साठी येणा-या ग्रामीण भागातील रहिवाशी व छोट्या व्यावसायिकांनी आजच ठोकमध्ये माल घेऊन गावी नेला. शहरातील कोरोनाची ग्रामीण भागातील लोकांनीही धास्ती घेत गड्या आपला गाव बरा म्हणत वणीत येणे टाळले. तर काही व्यावसायिकांनी आज ग्रामीण भागातील ग्राहक अत्यल्प असल्याचे ‘वणी बहुगुणी’जवळ सांगितले.
बैठक, पार्टी व संपर्कातील विलगीकरण कक्षात…
रविवारी रात्री ‘बैठकी’तील संपर्कात आलेल्या काही प्रतिष्ठीत व्यक्तींना विलगीकरण कक्षात टाकल्यानंतर आज दुपारी वर्धापन दिनाच्या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींना विलगीकरण करण्यास सुरूवात झाली. यात सेठ, मालक, उच्चभ्रू, अधिकारी, प्रतिष्ठीत इत्यादींचा भरणा अधिक असल्याची माहिती आहे. दरम्यान पार्टीची बातमी प्रकाशीत होताच आज दिवसभर सोशल पार्टीविषयी चांगलीच चर्चा रंगली. यावर लोकांनी पोस्ट व कमेन्ट टाकत यावर विविध प्रतिक्रिया दिल्यात. तसेच दरम्यानच्या काळात अशा पार्टी व समारंभात सहभागी झालेल्यांनी स्वतःहून कॉरेन्टाईन व्हावे असे आवाहनही करण्यात आले.
पार्टी ते परसोडा… एक प्रवास….
नेहमी एसी व ऐशोआरामात राहण्याची सवय असणा-या काही व्यक्तींना परसोडा येथील कोविड केअर सेन्टर सुट झाले नाही. विलगीकरण कक्षात सोयीसुविधेचा अभाव असल्याचे कारण देत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. एका व्यक्तीने तर दिवसभर तक्रारीचा पाढा वाचत प्रशासनाजवळ काही ‘अभिनव’ मागणी केल्यात. दरम्यान त्यांनी विविध ‘जावई’शोध लावल्याने प्रशासन बुचकाळ्यात पडले. अखेर प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने दिवसभरापासून त्यांनी कोविड केअर सेंटर डोक्यावर घेतल्याचेही समजते.
वरोरा रोड बंद… वापरा हा मार्ग….
वरोरा रोडवरीली काही भाग हा कंटेनमेन्ट झोनमध्ये (प्रतिबंधीत क्षेत्र) येत असल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे. हा संपूर्ण परिसर काल रात्रीपासून 14 दिवसांसाठी लॉक करण्यात आला आहे. त्यामुळे वरोरा जाण्यासाठी लोकांनी बायपास किंवा निळापूर रोडचा वापर करावा अशी माहिती प्रशासनाने दिली. याबाबत माहिती नसल्याने आज अनेकांना या रस्त्यावरून परत जावे लागते. दरम्यान कंटेनमेन्ट झोन मधल्या लोकांची आज तपासणी करण्यात आली. कुणी घराबाहेर पडू नये यासाठी या परिसरातील घर आणि बिल्डिंग लॉक लावून सिल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. शिवाय इथे राहणा-या कोणत्याही नागरिकांनी बाहेर निघू नये तसेच काही हवे असल्यास त्या वस्तू प्रशासनाकडून मागवून घ्याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
हे पण वाचा…‘दादां’च्या पार्टीने केला वांदा, वाढवले अनेकांचे टेन्शन…