जब्बार चीनी, वणी: सेवानगरमध्ये कोरोनाचा 7 वा रुग्ण आढळल्यानंतर 32 जणांचेही स्वॅब यवतमाळला तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ते सर्व रिपोर्ट काल निगेटिव्ह आले होते. या दिलासादायक बातमीनंतर आज पुन्हा 11 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. हे 11 स्वॅब काल पाठवण्यात आले होते. सलग 32 आणि 11 रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर वणीतील कोरोनाची साखळी जवळपास खंडीत झाली आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी दिली. याशिवाय लो रिस्क व्यक्तींनी स्वत:हून समोर यावे. त्यांचे केवळ स्वॅब पाठवले जाणार असून त्यांना संस्थात्मक कॉरन्टाईनही केले जाणार नाही अशी ही माहिती त्यांनी दिली.
सेवानगरमध्ये सातवा रुग्ण सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सेवानगर हा दाटीवाटीचा व स्लम परिसर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शहरात चांगलेच चिंतेचे वातावरण पसरले होते. दरम्यान याचा संदर्भ घेऊन जनता कर्फ्यूचेही वणीत आयोजन करण्यात आले होते. मात्र आधीचे 32 रिपोर्ट व आता 11 रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर वणीकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
आात वृद्ध व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी
कोरोनाची साखळी जवळपास खंडीत झाली असली तरी खबरदारी म्हणून प्रशासन लो रिस्क असलेल्या व्यक्तींचेही स्वॅब पाठवत आहे. कॉन्टेन्मेंट झोन येथील ज्या व्यक्ती 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या असून ज्या व्यक्तींना मधूमेह, बीपी, दमा असे आजार आहेत अशा व्यक्तींचे खबरदारी म्हणून स्वॅब घेणे सुरू आहे. ही प्रक्रिया आणखी काही दिवस सलग चालणार आहे.
घाबरू नका, कॉरन्टाईन केले जाणार नाही – डॉ. शरद जावळे
वणीतील कोरोनाची साखळी आता खंडीत झाली असे आपण म्हणून शकतो. मात्र अद्यापही कोणतेही जोखीम आपण उचलणार नाहीये. प्रतिबंधीत क्षेत्रातील ज्याही व्यक्ती 3 ते चार दिवसांपासून सर्दी, पडसे किंवा तापाने आजारी आहेत त्यांनी याची माहिती लगेचे प्रशासनाला द्वावी. सध्या कॉरन्टाईन करण्याच्या भीतीने अनेक लोक अशी माहिती लपवत आहेत. मात्र अशा व्यक्तींनी स्वत:हून समोर यावे व प्रशासनाला याची माहिती द्यावी. किंवा परसोडा येथे भेट द्यावी. त्या व्यक्तीचे सॅम्पल घेण्यात येईल व त्यांना संस्थात्मक कॉरन्टाईनही केले जाणार नाही.
– डॉ. शरद जावळे, उपविभागीय अधिकारी, वणी
प्रतिबंधित क्षेत्रात ‘जनता क्लिनिक’
वणीत सध्या तीन प्रतिबंधीत क्षेत्र आहे. यात 932, 535, 297 लोक सध्या कॉरन्टाईन आहेत. त्या व्यक्तींच्या वैद्यकीय मदतीसाठी महावीर भवन व सेवानगर येथे ‘जनता क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे. या परिसरातील ज्या व्यक्तींना काही वैद्यकीय मदत हवी असेल अशा व्यक्तींची येथे डॉक्टरांकडून तपासणी केली जात असून त्यांना त्यांच्यावर योग्य तो उपचार केला जात आहे. याशिवाय सेवानगर येथे गरीब वस्ती अधिक असल्याने या वस्तीतील 32 कुटुंबांना प्रशासनातर्फे किराणा सामानाची कीट वाटण्यात आली.
आशा वर्कर्सना सहकार्य करण्याचे आवाहन
सध्या आशा वर्कर्सच्या 9 टीम वणीमध्ये सर्वेसाठी कार्यरत आहेत. आशा वर्कर्सच्या माहितीच्या आधारावर सध्या योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र काही नागरिक आशा वर्कर्सना सहकार्य करीत ऩसल्याचे समोर येत आहे. घरी कुणी नाही, बाहेरगावाहून कुणीही आले नाही अशी खोटी माहिती त्यांना दिली जाते. अशी माहिती लपवणे धोकादायक ठरू शकते त्यामुळे नागरिकांनी आशा वर्कर्सना सहकार्य करा व खरी माहिती द्या असे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
(हे पण वाचा: ‘जनता कर्फ्यू’ काय होतं पडद्यामागचं राजकारण…)